Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

राज्यात २४ तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग; नदी नाले तुडुंब जनजीवन विस्कळीत, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट तर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी...

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत विविध स्तरांवरील हवामान इशारे जारी केले आहेत.

संभाव्य पूरस्थिती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी प्रशासनाने विशेष खबरदारीचे आदेशही दिले आहेत. ओडिशा परिसरातील कमी दाबाच्या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावरील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. प्रशासनाने नदी-नाले, पूरप्रवण भाग आणि सखल क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, आवश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

आज या जिल्ह्यांना रेड अलर्ट-

जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे-

पालघर, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमरावतीत पूरस्थिती, शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. नदी-नाले ओसंडून वाहू लागल्याने सुमारे 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. काही गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले असून एका दुचाकीस्वाराच्या वाहून गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

संततधार पाऊस आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात वाहतुकीवर परिणाम

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांत मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर आला आहे. सातपुडा परिसरात अतिवृष्टीमुळे काही मार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून शेतजमिनींमध्येही पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे.

मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील स्थिती काय?

मुंबईत अधूनमधून पावसाची शक्यता कायम असून ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून रेल्वे वाहतुकीवर किरकोळ परिणाम झाला आहे. पुणे, नाशिक आणि नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमध्येही पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा, पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचा आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon