Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

संतापजनक घटना: 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं; कौटुंबिक वादातून अमानुष कृत्य, बाळावर रुग्णालयात उपचार सुरू.!

पुण्यातील लोहगाव परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून अवघ्या 9 महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना 31 जुलै रोजी लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी बाळाचे वडील अल्ताफ नबी शेख यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीची पत्नी जैनाब आणि तिची भावजय सानिया शेख यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. याच वादातून आरोपी महिलेने घरात झोपलेल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर कोणालाही याबाबत माहिती दिली किंवा पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, इतर दोन जणांनीही तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर बाळाच्या आईने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केल्यामुळे बाळाचा जीव वाचला असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बाळाच्या वडिलांच्या तक्रारीवरून लोहगाव पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह एकूण तिघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon