Dailyhunt

सरकारचा नैसर्गिक वायू इंधनावर भर; 'पीएनजी' ग्राहकसंख्या साडेतीन लाखांच्या पुढे

देशात एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) पुरवठ्यावर मोठा भर दिला आहे. घरगुती तसेच वाहतूक क्षेत्रासाठी पीएनजी आणि सीएनजीचा शंभर टक्के पुरवठा सुनिश्चित करण्याचे धोरण राबवले जात असून, ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात साडेतीन लाखांहून अधिक पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. केवळ मार्च 2026 पासूनच 3.42 लाखांपेक्षा अधिक नवीन जोडण्या सुरू झाल्या असून, आणखी 3.7 लाखांहून अधिक ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे.

केंद्र सरकारने 18 मार्च रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त 10 टक्के साठा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून एलपीजीवरून पीएनजीकडे संक्रमणास राज्यांनी सहकार्य करावे, अशी अट घालण्यात आली आहे.

पीएनजी सेवांचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने राज्ये आणि संबंधित प्राधिकरणांना शहरी वायू वितरण प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या 10 राज्यांना अतिरिक्त एलपीजी साठा देण्यात येत असून, आणखी एका राज्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गेल्या आठवड्यातच 110 भागांमध्ये 75 हजारांपेक्षा अधिक गॅस जोडण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महापालिका आणि इंधन वितरण कंपन्यांकडून नागरिकांना पीएनजी जोडण्या घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व शहरांमध्ये अद्याप पीएनजी सुविधा उपलब्ध नसली तरी शासन स्तरावर त्याचा विस्तार वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon