शिरपूर-चोपडा रस्त्यावर कालच एका मालवाहतूक ट्रकचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चालकाचा ताबा सुटल्याने लसणाने भरलेली आयशर ट्रक थेट पुलाचे कठडे तोडून अनेर नदी पात्रात जाऊन कोसळली.
यात चालक तसेच सहचालक दोन्ही गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने शिरपूर येथे रवाना करण्यात आले आहे.
शिरपूरहून चोपडाच्या दिशेने जाणारी आयशर ट्रक अनेर नदीवरील अरुंद पुलाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन पुलाचे कठडे तोडत थेट नदीपात्रात जाऊन कोसळले. आज दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान हा अपघात झाला.
शिरपूर-चोपडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर अनेर नदीवर असलेला हा पूल सध्या वाहन चालकांसाठी धोक्याचे ठिकाण ठरत असून याठिकाणी दर पंधरा ते वीस दिवसांत इथे नेहमीच अपघात होत असतात. पुलाच्या क्षमते बाहेरील अवजड वाहनांची वर्दळ, अरुंद पुल, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे. काही वेळा पुलावरच ट्रक अपघात होत असल्याने याठिकाणी तासंतास रहदारी ठप्प असते. या वाढत्या अपघातांमुळे अनेक नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
प्रशासनाकडून बऱ्याच वेळा पुलाची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र याठिकाणी नव्याने पूर्ण क्षमतेचा मोठा पुल निर्माण केला जावा तरच अपघातांचे प्रमाण थांबवता येईल अन्यथा अपघात घडतच राहतील अशी अपेक्षा व खंत देखील येथील स्थानिक वाहनधारकांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.
