श्रावण महिन्यात मांसाहारी जेवण बनवण्याच्या मागणीवरून झालेल्या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाचा वडिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी मृताच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव महेश भागवत गायकवाड (30) असून, त्याचे वडील भागवत सूर्यभान गायकवाड (64) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (60) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रामनगर परिसरात 24 ऑगस्टच्या रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारूच्या नशेत मटण बनवण्याचा आग्रह
पोलिसांच्या माहितीनुसार, महेशला दारूचे व्यसन होते. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे आणि रोजगार नसल्याने वैवाहिक जीवनातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर पत्नी दोन मुलांसह माहेरी गेली होती. महेश आपल्या आई-वडिलांच्या घराशेजारी राहत होता आणि जेवणासाठी त्यांच्याकडे जात होता.
24 ऑगस्टच्या रात्री साडेदहाच्या सुमारास महेश दारूच्या नशेत घरी आला. त्याने आई-वडिलांकडे मटणाचे कालवण बनवून देण्याचा आग्रह धरला. मात्र, श्रावण महिन्यामुळे घरात मांसाहार बनवला जाणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले. यावरून महेश आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाला.
मारहाणीत तरुणाचा मृत्यू
वाद वाढल्यानंतर भागवत गायकवाड यांनी महेशच्या डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत महेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर महेशच्या मृत्यूची माहिती तातडीने बाहेर न जाता ती लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आई पार्वती हिने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
महेशच्या मोठ्या भावाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना देत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून महेशच्या वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तर आईविरोधात पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत असून, घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि मारहाणीचे नेमके कारण याबाबत अधिक तपास सुरू आहे.
