Dailyhunt

सिंहस्थ कुंभमेळा : विकास कामांचा मुख्य सचिवांकडून आढावा; नाशिक दौऱ्यात अधिकाऱ्यांना सूचना

नाशिक : पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांचा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर दौऱ्यात आढावा घेतला. देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

मुख्य सचिवांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ उभारला जाणारा समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम तसेच गोदावरी नदी काठावर सुरू असलेल्या नवीन घाटांच्या कामांची पाहणी केली. याशिवाय नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन, आगरटाकळी आणि दसक-पंचक येथे सुरू असलेल्या मलजल शुद्धीकरण प्रकल्पांचीही त्यांनी माहिती घेतली.

त्यानंतर अग्रवाल यांनी पांडव लेणी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व खत निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. तसेच महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देत, राजुर बहुला येथे उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्राच्या कामांचाही आढावा घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कुंभमेळ्यासाठी सर्वसमावेशक नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देऊन कामे सुरू करण्यात आली असून, ती वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण होण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत नियमित देखरेख केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा मुख्य सचिवांना सादर केला. या दौऱ्यात महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon