Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

तळोद्यात गर्भवतीला बांबूच्या झोळीतून दोन किमी वाहून नेण्याची वेळ; रस्ता व पुलाअभावी उपचारासाठी जीवघेणा प्रवास, दुर्गम भागातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. टाकली गावातील एका गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांना सुमारे दोन किलोमीटर बांबूच्या झोळीतून खांद्यावर वाहून न्यावे लागल्याची घटना घडली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, टाकली गावाला आजही सर्व हंगामात वापरता येईल असा रस्ता उपलब्ध नाही. तसेच निझरा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महिलेची प्रकृती खालावल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तिला बांबूच्या झोळीतून दोन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर मालवाहू वाहनाच्या मदतीने पुढील प्रवास करून अखेरीस रुग्णवाहिकेद्वारे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे दुर्गम आदिवासी भागातील रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची वस्तुस्थिती या घटनेतून समोर आली आहे.

टाकली गावाला जोडणारा सर्वहंगामी रस्ता तसेच निझरा नदीवरील अपूर्ण पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon