धाराशिव शहरातील स्थानिक राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे गटातील नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच पाच नगरसेवकांनी ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे.
उद्धव ठाकरे गटातील पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मुंबईकडे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हे नगरसेवक इंदापूरपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी अचानक आपला मार्ग बदलला.
मुंबईऐवजी ते धाराशिवला परतले. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगितले जाते. अखेर बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
भाजपच्या हालचालींना अनपेक्षित धक्का?
धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेत उद्धव ठाकरे गटातील दहा नगरसेवकांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर धाराशिव शहरातील नगरसेवकांबाबतही भाजपकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पाच नगरसेवक शिवसेनेत गेल्याने या घडामोडीकडे भाजपच्या प्रयत्नांना बसलेला राजकीय धक्का म्हणून पाहिले जात आहे.
या संपूर्ण राजकीय घडामोडीत खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे गटातील उर्वरित नगरसेवक कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नगरसेवकांच्या या पक्षांतरामागे आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चाही शहरात रंगू लागल्या आहेत. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत आधार किंवा पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे या चर्चांपेक्षा प्रत्यक्षात पुढे कोणते राजकीय निर्णय होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
नगरसेवकांच्या या पळवापळवीमुळे धाराशिवच्या स्थानिक राजकारणात आगामी काळात आणखी उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
