Dailyhunt

तोरखेडा येथे धाडसी घरफोडी; २.४९ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल.!

हादा तालुक्यातील तोरखेडा येथे धाडसी घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

तोरखेडा येथील रहिवासी शिवदास प्रल्हाद गिरणारे यांच्या घरात ही चोरी झाली. ३ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते घराबाहेर होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ४ मे रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी थेट कपाटांवर हात साफ केला. घरातील दोन लोखंडी कपाटांमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील दागिने, चांदीचे जोडवे तसेच सुमारे ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी फिर्यादी शिवदास गिरणारे यांच्या तक्रारीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५ आणि ३३१(४) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या कलमांनुसार घरात घुसून चोरी करणे आणि रात्रीच्या वेळी घरफोडी करणे हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon