Dailyhunt

उत्राण येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल ४७० स्पर्धकांचा सहभाग; विजेत्यांना १२ मोटारसायकलींचे आकर्षक बक्षीस..!

ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या बैलगाडा शर्यतींना चालना देण्यासाठी उत्राण येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. या भव्य स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४७० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून, हजारो ग्रामस्थांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला.

एरंडोल तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच भागवतदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने या राज्यस्तरीय 'केसरी' बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आयोजकांचे कौतुक करत, अशा स्पर्धांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पारंपरिक कलेचे व्यासपीठ मिळते, असे मत व्यक्त केले.

स्पर्धेचे आयोजन दोन गटांमध्ये करण्यात आले होते. दोन्ही गटातील एकूण १२ विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस म्हणून चार होंडा शाईन आणि आठ इलेक्ट्रिक अशा एकूण १२ मोटारसायकलींचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या गटात परतवाडा (जि. अमरावती) येथील अद्विका अंकुश जावजळ यांच्या 'छोटा बाबा' आणि कु-हाड (ता. पाचोरा) येथील प्रेरणा हरिदास माळी यांच्या 'बागी डॉन' या बैलगाड्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर शिंदखेडा (जि. बुलढाणा) येथील 'रुबाब' या जोडीने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ओंकार पाटील, अमृता पाटील, समाधान जाधव आणि योगेश चव्हाण यांच्या बैलगाड्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

दुसऱ्या 'आदत बैलगाडा' गटात गणेशपूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील संजय पाटील यांच्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला, तर साई मिस्त्री यांच्या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच आबा पाटील, भगतसिंग राजपूत, अभिजित जंजाळ, बाजीराव जाधव आणि भारत आवारे यांच्या बैलगाड्यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रकाश कुंवर यांनी केले, तर दीपक पाटील यांनी आभार मानले. आयोजक भागवत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

दरम्यान, बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असून ग्रामीण भागात आजही ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण क्रीडा आणि संस्कृतीला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon