उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणात तपासादरम्यान नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम तसेच सोने-चांदीच्या देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे देशभरातील रामभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी अविनाश शुक्ला याच्यावर १५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचा संशय आहे. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, चोरीच्या पैशांपैकी काही रक्कम त्याने आपल्या प्रेयसीवर खर्च केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
प्रेयसीला महागडा मोबाईल, दोन लाखांची रोख रक्कम
चौकशीत असे समोर आले आहे की, अविनाश शुक्लाने कथित चोरीच्या पैशातून आपल्या प्रेयसीला महागडा मोबाईल फोन भेट दिला. तसेच खर्चासाठी सुमारे दोन लाख रुपये रोख दिल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय इतर ठिकाणीही त्याने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याची शक्यता तपासली जात आहे.
पोलीस आता ही रक्कम नेमकी कुठून आणि कशा पद्धतीने वळवण्यात आली, तसेच त्याचा आणखी कोणाला फायदा झाला का, याचा सखोल तपास करत आहेत.
भावालाही आला होता संशय
तपासादरम्यान आरोपीचा भाऊ अभिषेक शुक्ला यानेही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, ड्युटी संपल्यानंतर अविनाश वारंवार मोठी रोख रक्कम घेऊन एका योग केंद्रात जात असे. याबाबत विचारणा केल्यावर तो समाधानकारक उत्तर देत नव्हता.
अविनाशने भावाला सांगितले होते की, दर्शनासाठी मदत केल्यामुळे भाविक स्वेच्छेने त्याला पैसे देतात. मात्र हे स्पष्टीकरण संशयास्पद वाटल्याने अभिषेकने याबाबत शंका व्यक्त केली होती. आता त्याने ही माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली असून, त्या योग केंद्रासह इतर धागेदोरेही तपासले जात आहेत.
एसआयटीकडून तपासाची व्याप्ती वाढवली
या प्रकरणी आतापर्यंत आठहून अधिक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. काही संबंधित अधिकारी आणि संचालकही विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांनी आरोपींची घरे, दुकाने, बँक व्यवहार, नातेवाईक आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. कथित गैरव्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
