Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

वाढदिवसाच्या आनंदावर नियतीचा घाला. नशिराबादमध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू.!

शिराबाद येथील भवानीनगर परिसरात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या तीन वर्षांची कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे हिचा राहत्या घराच्या आवारातील पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला होता. मात्र, त्या आनंदावर नियतीने क्षणार्धात दुःखाची छाया पसरवली.

घरातील सर्व सदस्य जेवणासाठी बसले असताना आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. खेळण्याच्या नादात तिचा पाय घसरला आणि ती घरातील पाण्याच्या हौदात पडली. बराच वेळ ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती हौदात आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य केले.

आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. यंदाच १ जुलै रोजी तिचा तिसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच या चिमुकलीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भवानीनगर परिसर सुन्न झाला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ही घटना प्रत्येक पालकासाठी एक वेदनादायी इशारा ठरत असून, घराच्या परिसरातील पाण्याचे हौद, टाक्या किंवा इतर धोकादायक ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon