Dailyhunt

वरणगावात वीज प्रश्नावर नगराध्यक्षांचा अल्टिमेटम; स्वतंत्र उपकेंद्राची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

ळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात वाढत्या वीज समस्येमुळे परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांचा तीव्र संताप उफाळून आला आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी-जास्त होणारा व्होल्टेज आणि अघोषित लोडशेडिंग यामुळे नागरिक आणि व्यापारी दोघेही त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महावितरण प्रशासनाला थेट अल्टिमेटम देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा धडक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यासंदर्भात आयोजित बैठकीत उपनगराध्यक्षा अरुणाताई इंगळे, नगरसेविका माला मेढे, श्रद्धा गायकवाड, तसेच नगरसेवक आणि महावितरणचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा,कर्ज दिलं पण व्याजाचे पैसे परत न केल्याने सावकाराकडून महिलेवर अत्याचार, 200 ते 300 अत्याचाराचे व्हिडिओ; पीडितेच्या दाव्याने खळबळ….!

सध्या वरणगावला पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त भार पडत असल्याने तांत्रिक बिघाड वाढले आहेत. परिणामी, वीजपुरवठा विस्कळीत होत असून घरगुती उपकरणे खराब होण्यासोबतच व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावरही होत असून नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून वरणगाव शहरासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

येत्या काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अटळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon