Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

​विधान परिषद की नेत्यांची 'घरची परिषद'? मुला-मुलींसाठी जोरदार लॉबिंग; अहोरात्र राबणारा कार्यकर्ता मात्र वाऱ्यावर!

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १७ जागांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रस्सीखेच सुरू असून इच्छुकांची मोठी रीघ लागली आहे.

मात्र, यंदाची निवडणूक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. महायुती असो की महाविकास आघाडी, बहुतांश बड्या नेत्यांनी आपल्याच मुला-मुलींना आमदार करण्यासाठी पक्षपातळीवर फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे, पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी पडद्यामागे अहोरात्र कष्ट करणारा सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याचे चित्र आहे.


​नेत्यांची फौज मैदानावर; मुलांच्या नावासाठी थेट ‘वजन’

​नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी किंवा ज्येष्ठ-अभ्यासू नेत्यांना संधी देण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग वापरला जातो, असा दावा सर्वच पक्ष करतात. मात्र, यंदा नेत्यांनी थेट आपल्या घरातच आमदारकी खेचून आणण्यासाठी दबाव गट तयार केला आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील नेत्यांची नावे आणि त्यांच्या मतदारसंघातील चर्चा आघाडीवर आहेत:
​जळगाव विधान परिषद: शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर थेट दावा ठोकत आपला मुलगा प्रतापराव पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. तर दुसरीकडे, याच पक्षाचे आमदार किशोर पाटील हे देखील आपला मुलगा सुमीत पाटील याच्यासाठी आग्रही आहेत. जळगावात दोन्ही आमदारांच्या मुलांमध्येच आता पक्षांतर्गत स्पर्धा पाहायला मिळत आहे.
​ठाणे विधान परिषद: ठाण्यात राजकीय समीकरणांची उलथापालथ होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या ठाकुर गटाकडून क्षितिज ठाकूर यांच्यासाठी शिंदेची शिवसेना किंवा भाजपसोबत पडद्यामागे ‘सेटिंग’ सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे विद्यमान आमदार रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे पुन्हा एकदा रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही आपला मुलगा विकास गोगावले याच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
​परभणी-हिंगोली विधान परिषद: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आपल्या मुलाला म्हणजेच अभिमन्यू खोतकरला आमदार करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे.
​चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा: या मतदारसंघात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या निवडणुकीच्या शर्यतीत होत्या. मात्र, कायदेशीर वयापेक्षा अवघा एक महिना कमी भरत असल्याने त्यांना अनिच्छेने माघार घ्यावी लागली आहे.


​नेत्यांची मुलं ‘नशीबवान’, कार्यकर्ता ‘कष्टवान’च राहणार?

​विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांना निवडून आणण्यासाठी उन्हा-तान्हात फिरणारा, पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणारा कार्यकर्ता मात्र या सगळ्या गणितात बाजूला पडला आहे. “निवडणुका आल्या की नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण होते, पण सत्तेची पदे वाटताना फक्त नेत्यांचीच मुलं पुढे कशी येतात?” असा संतप्त सवाल आता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून खाजगीत विचारला जात आहे.

​आरोप-प्रत्यारोपांनंतर ‘परिवारवादाचा’ डाग पुसणार का?
​पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे सर्वच मोठे नेते काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर ‘परिवारवादाची’ (घराणेशाही) चिखलफेक करत असतात. मात्र, आता महायुतीतच मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मुलांसाठी ज्या प्रकारे लॉबिंग सुरू आहे, ते पाहता भाजप हा घराणेशाहीचा फॉर्म्युला मोडून काढणार का? सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन महायुती आणि महाविकास आघाडी आपल्यावरील परिवारवादाचा डाग पुसणार का? हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Jalgaon