त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय शेअरबाजाराची बुधवारची तुफान तेजी गुंतवणूकदारांमध्ये नवा जोश भरणारी ठरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअरबाजाराने तुफानी तेजी अनुभवली.
कच्च्या तेलाच्या दरात 14 टक्के इतकी घसघशीत घसरण दिसली तर रुपयानेही तेजीचा कल पकडला. जागतिक बाजारांनीही ट्रम्प यांच्या घोषणेचे तेजीसह जोरदार स्वागत केले.
अमेरिका-इराण युद्धबंदी : अमेरिका व इराण यांच्यात 2 आठवड्यांसाठी युद्धबंदी लागू झाल्याने जागतिक तणावात घट झाली. जागतिक शांतीसाठी महत्त्वाचे पाऊल असा संदेश देत गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण केला.
कच्च्या तेलाच्या किमती घसरणीत : याचदरम्यान युद्धबंदीची घोषणा होताच ब्रेंट व्रुड या कच्च्या तेलाच्या किमती धाडकन खाली आल्या. ब्रेंट व्रुडचे दर 13 टक्के घसरण दिसून आली. कच्चे तेलाचे दर 94 डॉलरवर घसरले. महागाई व ऊर्जा पुरवठ्याच्या संकटावर याने फुंकर मारली.
जागतिक बाजारात तेजी : आशियाई बाजारांसह विविध जागतिक बाजारात तेजी होती. दक्षिण कोरीयाचा कोस्पी 6.87 टक्के वाढत 5872 वर बंद झाला तर जपानचा निक्केई 5.39 टक्के वाढत 56,308 वर आणि हाँगकाँगचा हँगसेंग 3.09 टक्के चढत 25,893 वर बंद झाला. चीनचा शांघाय कंपोझीट 2.69 टक्के वाढत 3995 वर पोहचला होता.
रुपया वधारला : याचदरम्यान युद्धबंदीच्या निर्णयाचा परिणाम सकारात्मक डॉलरच्या तुलनेत रुपयावर दिसला. 50 पैसे मजबूत होत रुपया 92.56 वर पोहचला होता.

रिझर्व्ह बँकेचा दिलासा: रिझर्व्ह बँकेची द्विमासिक बैठक बुधवारी संपली. त्यात रेपो दर जैसे थे म्हणजेच 5.25 टक्केच राहणार असल्याची घोषणा गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली. याने बाजाराला मजबुतता आली.
समभागांची खरेदी: युद्धबंदीची घोषणा होताच गुंतवणूकदारांमध्ये नवउत्साह संचारलेला दिसून आला. चांगल्या मूल्याचे समभाग व इतरही समभागांची जोरदार खरेदी गुंतवणूकदारांनी केली होती.
व्होलाटॅलीटी निर्देशांक : इंडिया व्हीआयएक्स अर्थात व्होलाटॅलीटी इंडेक्स 10 टक्के घसरत 19.85 वर आला. याचा अर्थ बाजारातील अस्थिरता कमी झाली असा होतो. याचा बाजाराला आधार मिळाला.

