दोन पॅन कार्ड प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून शिक्षेत वाढ
वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना रामपूर खासदार-आमदार सत्र न्यायालयाने दोन पॅन कार्ड प्रकरणांमध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांची सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच त्यांना 3.5 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दोन पॅन कार्ड प्रकरणातील शिक्षेत वाढ करण्याच्या अपिलानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.
नोव्हेंबर 2025 मध्ये रामपूर खासदार-आमदार न्यायालयाने दोन पॅन कार्ड प्रकरणांमध्ये आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांना प्रत्येकी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावल्यापासून आझम खान आणि अब्दुल्ला आझम सध्या रामपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या शिक्षेनंतर बचाव पक्षाने शिक्षेला आव्हान देणारी याचिका खासदार-आमदार सत्र न्यायालयात दाखल केली होते. तसेच अभियोजन पक्षाने शिक्षा वाढवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. शिक्षेविरुद्धचे बचाव पक्षाचे अपील सत्र न्यायालयाने आधीच फेटाळले होते. आता न्यायालयाने अभियोजन पक्षाच्या शिक्षा वाढवण्याच्या अपिलावर आपला निकाल देत कारावास तीन वर्षांनी वाढवला. तसेच दंडाची रक्कमही वाढवण्यात आली.

