Dailyhunt
आणखी दोन वर्षे सिद्धरामय्याच 'सीएम'!

आणखी दोन वर्षे सिद्धरामय्याच 'सीएम'!

डॉ. परमेश्वर यांचे वक्तव्य : हायकमांडने स्पष्टीकरण देण्याची गरज नाही

बेंगळूर : राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा बाजूला पडला आहे.

असे असतानाच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या विषयावर भाष्य केले आहे. सिद्धरामय्या हे आणखी दोन वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहतील. 2023 मध्ये सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री अशी घोषणा पक्षाच्या हायकमांडने केली होती. त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. हायकमांडने याबाबत स्वतंत्र स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असेही परमेश्वर यांनी म्हटले आहे.

सोमवारी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना डॉ. परमेश्वर म्हणाले, 2013 मध्ये सिद्धरामय्या हे पाच वर्षांकरिता मुख्यमंत्रिपदावर राहतील अशी घोषणा केली नव्हती. तेव्हा ते पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी होते. यावेळी देखील त्यांनी पदाचा कार्यकाळ पूर्ण करावा. हायकमांडने नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम निर्माण केलेला नाही. कोणी काय म्हटले, याने काहीही फरक पडत नाही. सिद्धरामय्या यांचा कार्यकाळ किती असेल यावर कधीही वाच्यता केलेली नाही. याचाच अर्थ असा की, कोणताही बदल झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांडच निर्णय घेते. हायकमांडच याविषयी बोलत नसताना इतरांनी काहीही म्हटले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

दोन्ही मतदारसंघांत आमचाच विजय!

पोटनिवडणुकीचे निकाल हे राज्य राजकारणासाठी मार्गसूची नाही. पोटनिवडणुकीचे निकाल हे राज्य सरकारला दिलेले गुणही नाहीत. निकालामध्ये कोणताही बदल होणार नाही. आम्ही दोन्ही मतदारसंघांमध्ये विजयी होवू. गॅरंटी योजनांच्या पलीकडे जाऊन लोक या सरकारच्या प्रशासकीय कामकाजाची दखल घेऊन मतदान करतील, असा आशावाद मंत्री डॉ. परमेश्वर यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat