Dailyhunt
अभिषेकच्या नावावर सर्वाधिक भोपळे

अभिषेकच्या नावावर सर्वाधिक भोपळे

वृत्तसंस्था/ हैदराबाद

भारताचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा अभिषेक शर्मा सध्या बॅड पॅचमधून जात आहे. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी तो सध्या झगडत आहे.

2026 च्या क्रिकेट हंगामामध्ये अभिषेक शर्मा आतापर्यंत सहा वेळा आपले खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला आहे. एक वर्षाच्या क्रिकेट हंगामात यापूर्वी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा तसेच संजू सॅमसन यांनाही प्रत्येकी सहा वेळा आपले खाते उघडता आले नाही. आता अभिषेकने रोहित आणि संजू सॅमसन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

2018 च्या क्रिकेट हंगामात रोहित शर्माला सहा वेळा तर 2024 च्या क्रिकेट हंगामात संजू सॅमसनला सहा वेळा आपले खाते उघडता आले नाही. टी-20 प्रकारात वर्षभराच्या कालावधीत रोहित आणि सॅमसन यांच्या नावावर सर्वाधिक भोपळे नोंदविले गेले असून आता या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्माचा ही समावेश झाला आहे.

2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अभिषेक शर्माने आतापर्यंत तीन डावात केवळ 55 धावा जमविल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या या स्पर्धेतील आपल्या शेवटच्या सामन्यात त्याने 48 धावा जमविल्या होत्या. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अभिषेक शर्माने 8 डावात 17.62 धावांच्या सरासरीने 141 धावा जमविल्या असून त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 2026 च्या आयपीएल स्पर्धेत अभिषेक सलग 3 डावात शून्यावर बाद झाला. चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात अभिषेक शर्मा फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असून त्याने आतापर्यंत 16 टी-20 सामन्यात 25.20 धावांच्या सरासरीने 378 धावा जमविल्या असून त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat