Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अद्रमुकमधील बंडाळी आली संपुष्टात

अद्रमुकमधील बंडाळी आली संपुष्टात

विजय यांच्याकडे गेलेले तीन आमदार परत पक्षात

► वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडूतील अद्रमुक पक्षातील बंडाळी संपुष्टात आली आहे. या पक्षाच्या 25 आमदारांनी नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या विधानसभेतील शक्तीपरीक्षणाच्या वेळी त्यांच्या बाजूने मतदान केले होते.

तसेच या बंडखोर गटाच्या तीन आमदारांनी आपल्या आमदारकीचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, आता पक्षातील सर्व मतभेद मिटले असून पक्ष एकसंधपणे पुढची वाटचाल करणार आहे. तसेच सर्व आमदार पक्षात परत आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

पक्षनेते ई. पलानीस्वामी यांनी बुधवारी अन्य ज्येष्ठ नेत्यांसमवेत विधानसभेचे अध्यक्ष जीसीडी प्रभाकर यांची भेट घेतली. पक्षाच्या दोन्ही गटांनी आता एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गटांना विधानसभेत बसण्यासाठी स्वतंत्र जागा द्यावी, ही मागणी मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी अध्यक्षांनी दिली. तसेच पक्षाचे प्रतोदपदही विजय भास्कर यांना द्यावे, अशी मागणी बंडखोर गटाने आधी केली होती. ती मागणीही रद्द करावी, असे पक्ष विजय भास्कर यांनी अध्यक्षांना दिले. त्यामुळे पक्षात फूट पडण्याचे संकट टळले आहे, असे दिसून येत आहे. अध्यक्ष प्रभाकर यांनी अद्रमुकच्या नव्या याचिकांचा स्वीकार केला असून त्यांच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्यवेळी निर्णय देण्यात येईल, असे द्रमुकच्या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले. यामुळे पक्षावरचे संकट सध्यातरी टळले आहे, अशी प्रतिक्रिया तामिळनाडूत व्यक्त केली जात आहे.

अपात्रता मागणी मागे

पक्षाच्या 25 आमदारांनी पक्षादेश मोडून विजय यांना पाठिंबा दिल्यानंतर ई. पलानीस्वामी यांनी या 25 आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली होती. आता पक्षातील मतभेद आणि मनभेद दूर झाल्यामुळे ही मागणीही त्यांनी मागे घेतली आहे. बंडखोरांचे नेते सी. व्ही. शण्मुगम आणि एस. पी. वेलुमणी यांनी ई. पलानीस्वामी यांची भेट घेऊन बुधवारी दोन्ही गटांमध्ये समझोता घडविला आहे.

राज्यभर गती देणार

पक्षातील मतभेद हे चहाच्या पेल्यातील वादळ ठरल्यानंतर ई. पलानीस्वामी यांनी समाधान व्यक्त केले. आता पक्षाच्या राज्यभर वेग देण्यासाठी आपण सज्ज असून लवकरच पुन्हा लोकांपर्यंत जाण्यासाठी अभियान हाती घेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. ते लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती दिली गेली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat