Dailyhunt
अमेरिका करणार इराणवर हल्ला?

अमेरिका करणार इराणवर हल्ला?

अल्पकालीन, परंतु तीव्र आघात करण्याची योजना

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

मेरिका इराणवर पुन्हा हल्ला करण्यासाठी सज्ज होत आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने अधिकृतरित्या या वृत्ताला दुजोरा दिला नसला, तरी तशी सज्जता केली जात आहे, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

हे हल्ले दीर्घकाळ चालणारे नसून अल्पकाळासाठी पण अत्यंत तीव्र क्षमतेचे असतील. इराणची अर्थव्यवस्था आणि युद्धसज्जता मोडून काढण्यासाठी ते केले जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

या हल्ल्यांच्या योजनेची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सेनाधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे. त्यानंतर ते अंतिम निर्णय घेणार आहेत. इराणच्या महताच्या आस्थापनांवर आणि ऊर्जा केंद्रांवर अकस्मात तीव्र विमान हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले केले जाण्याची शक्यता आहे. या कारवाईसाठी विशेष संहारक शस्त्रांचा उपयोग केला जाईल. कमीत कमी वेळेत इराणची जास्तीत जास्त हानी व्हावी, अशा प्रकारे ही योजना असल्याचे समजते.

चर्चेला भाग पाडण्यासाठी

अल्पकालीन पण तीव्र हल्ल्यांच्या लाटा इराणवर सोडल्या जातील. त्यामुळे तो देश होरपळून निघेल आणि चर्चेसाठी सज्ज होणे त्याला भाग पडेल. इराणची युद्ध करण्याची आणि युद्ध लांबविण्याची शक्ती कमी करणे हे या हल्ल्यांचे ध्येय असेल. तसे झाल्यास, तो देश चर्चेला संमत होईल आणि नंतर चर्चेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुक्ततेचा प्रश्न मार्गी लावणे अशी ही योजना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, हे हल्ले केव्हा केले जातील आणि किती काळ चालतील, याची माहिती अद्याप उपलब्ध नाही, असे स्पष्ट केले गेले.

या योजनेचे कारण काय…

सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा थंडावली आहे. चर्चा प्रक्रिया कुंठित झाली आहे. पाकिस्तानने याप्रकरणी केलेली मध्यस्थीही अपयशी ठरली आहे. इराणने अमेरिकेशी चर्चा करण्यास नकार दिला आहे. तसेच, स्वत:च्या अटी घातल्या आहेत, ज्या अमेरिका मान्य करणे अशक्य आहे. मात्र, या चर्चेचा प्रारंभ पुन्हा झाल्याशिवाय समस्येवर दीर्घकालीन तोडगा निघू शकत नाही. परिणामी, इराणवर चर्चेसाठी दबाव आणायचा असेल, तर त्यांची सामरिक हानी करणे हा उपाय आहे, असा अमेरिकेच्या धोरणकर्त्यांचा विचार आहे, अशी माहिती आहे.

त्यांना बसेल झटका…

अमेरिकेच्या हल्ला करण्याच्या योजनेची इराणने खिल्ली उडविली आहे. आमच्यावर त्यांनी हल्ला केला, तर त्यांनाच हृदयविकाराचा झटका' येईल, अशी खोचक टिप्पणी इराणच्या नेत्यांनी केली. आमच्याकडे अमेरिकेच्या प्रत्येक शस्त्राला निकामी करणारी शस्त्रे आहेत. अमेरिकेने कितीही मोठा हल्ला केला, तरी तो निष्प्रभ केला जाईल. आम्ही अमेरिकेच्या दबावात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हल्ले कधी होणार…

ड अमेरिका इराणवर केव्हाही हल्ले करण्याच्या सज्जतेत असल्याची माहिती

ड इराणची युद्ध करण्याची क्षमता मोडकळीस आणल्याची अमेरिकेची योजना

ड इराणचा पुन्हा अमेरिकेला इशारा, दबावाखाली येणार नसल्याचा निर्धार व्यक्त

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat