ट्रम्प-जिनपिंग-पुतीन भेटीत सकारात्मक चर्चा : संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांसाठी व्यापक निर्णय
वृत्तसंस्था/शेनझेन
'अपेक समिट 2026' अंतर्गत अमेरिका, चीन आणि रशिया या तीन महासत्तांच्या प्रमुखांची ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक गुरुवारी झाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात तासाभराहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीत अण्वस्त्रांचा धोका कमी करणे, अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे तसेच इराण आणि युक्रेनमधील युद्धाच्या मुद्यांवर विचारविमर्ष झाला. याप्रसंगी तिन्ही देशांनी जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका मांडली.
अणुयुद्धात कोणाचाही विजय होऊ शकत नाही आणि असे युद्ध कधीही लढले जाऊ नये, यावर अमेरिका, चीन आणि रशियाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यानुसार नजिकच्या काळात अण्वस्त्रांशी संबंधित धोके कमी करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी तिन्ही देश एकमेकांशी चर्चा सुरू ठेवणार आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (युएनएससी) स्थायी सदस्य असलेल्या तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासनही दिले. सध्याच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक सक्षम करण्याचा या सुधारणांचा उद्देश आहे. याशिवाय इंधन पुरवठा वाढवण्याबाबतही चर्चा झाली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी शेनझेन येथे आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (अपेक) शिखर परिषदेदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत त्रिपक्षीय बैठक घेतली. त्यांनी या बैठकीचे वर्णन एक ऐतिहासिक प्रसंग असे केले. 'आपण खरोखरच इतिहास घडवत आहोत,' असे ट्रम्प बैठकीनंतर म्हणाले. पुतीन आणि शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर ट्रम्प अमेरिकेसाठी रवाना झाले. आपल्या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी चीनमधील शेन्झेन येथे सुमारे 26 तास घालवले. त्रिपक्षीय बैठक संपल्यानंतर पुतीनही किलिन व्हिला येथून रवाना झाले. शी जिनपिंग यांनी त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडले.
अणुशस्त्रांच्या धोक्यांवर चर्चेचा मुख्य भर
त्रिपक्षीय बैठकीत प्रामुख्याने अणुशस्त्रांच्या धोक्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. शी जिनपिंग यांनी अणुशस्त्रांचे वर्णन मानवतेवर टांगलेली तलवार असे करताना ती पूर्णपणे नष्ट केली पाहिजेत असे सांगितले. तर अमेरिका, रशिया आणि चीन हे तिन्ही देश जगातील अणुशस्त्रांची संख्या कशी कमी करायची आणि या शस्त्रांच्या वापराचा धोका कसा कमी करायचा यावर चर्चा करू शकतात, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. पुतीन यांनीही "जगात शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारी आम्ही तीन देशांची विभागून घ्यायला हवी", अशी सकारात्मक भूमिका मांडली. ट्रम्प यांच्यासोबतच्या त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत युक्रेन युद्ध हा चर्चेचा सर्वात महत्त्वाचा विषय होता, असे पुतीन यांनी सांगितले. बुधवारीही त्यांनी शी जिनपिंग यांच्यासोबतही युक्रेन संघर्षावर चर्चा केली होती. पुतीन यांचे हे विधान अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीच्या सुरुवातीला आले.
शांततेसाठी रशिया सकारात्मक
रशिया, चीन आणि अमेरिका एकत्र काम करून जागतिक स्थिरता मजबूत करू शकतात, असे पुतीन म्हणाले. वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशांनी एकमेकांशी संवाद साधावा, अंतिम इशारा देऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांचे सर्वव्यापी प्रतिपादन
अमेरिका इराणला अण्वस्त्रs मिळवू देणार नाही. इतर देशांनाही अण्वस्त्रs विकसित करण्यापासून रोखणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले. अमेरिका, रशिया आणि चीन एकत्र येऊन अण्वस्त्रांची संख्या कमी करू शकतात आणि त्यांच्या वापराचा धोका कमी करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावर पुतीन यांच्याशी दीर्घ चर्चा केली आहे. त्याव्यतिरिक्त अमेरिका आणि चीन या दोघांनाही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा सुरू राहावा असे वाटते. इराण युद्धापासून तेथील जहाजांची वाहतूक थांबवण्यात आल्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
संघर्ष टाळण्यासाठी चीन सक्रीय
चीन, रशिया आणि अमेरिका यांनी मैत्री टिकवून ठेवली पाहिजे. त्यांच्यात कोणतेही युद्ध किंवा संघर्ष होता कामा नये, अशी भूमिका शी जिनपिंग यांनी मांडली. या तीन देशांनी एकमेकांशी व्यापार वाढवला पाहिजे. व्यापार आणि पुरवठा साखळी रोखण्याऐवजी त्यांनी एकत्र काम केले पाहिजे. चीन, रशिया आणि अमेरिका यांनी युद्ध करणाऱ्या देशांना वाटाघाटीच्या टेबलावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाद संवादाने सोडवले पाहिजेत, असेही जिनपिंग म्हणाले. त्याव्यतिरिक्त अमेरिकेने तैवानबाबत सावधगिरीने पुढे जावे. त्यांच्या संबंधांना लक्षणीय हानी पोहोचवणारी कोणतीही कृती केली जाऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली.
ट्रम्प-जिनपिंग-पुतीन यांच्या संयुक्त निवेदनातील निर्णय…
'युएनएससी'मध्ये सुधारणा : संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीत सुधारणा करण्यावर एकमत.
तेल पुरवठा वाढवणे : जागतिक पातळीव पेट्रोलियम उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यावर एकमत.
अणुयुद्धाचा धोका कमी करणे : अणुशस्त्रांशी संबंधित धोके कमी करण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवणार.
सरकारी अधिकाऱ्यांसाठी कायदेशीर संरक्षण : एखाद्या देशाच्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकृत कामासाठी इतर देशांच्या न्यायालयांमधील कायदेशीर कारवाईतून सूट देण्यात यावी. शिवाय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये.

