28 जणांना घेतले ताब्यात : चौकशीअंती पश्चिम बंगालमधील कारागिर असल्याचे निष्पन्न, अखेर सुटका
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बांगलादेशी घुसखोर नागरिक असल्याच्या संशयावरून 28 जणांना ताब्यात घेऊन बेळगाव पोलिसांनी त्यांची चौकशी केली आहे.
चौकशीअंती ते बांगलादेशी नसून पश्चिम बंगालचे राहणारे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे.
अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मतदान करण्यासाठी हे कामगार पश्चिम बंगालला गेले होते. अमरावती एक्स्प्रेसमधून हुबळीपर्यंत येऊन परिवहन मंडळाच्या तीन वेगवेगळ्या बसमधून शनिवारी 23 मे रोजी ते बेळगावात दाखल झाले. हुबळीत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून स्थानिक प्रशासनाला माहिती देऊन काही जणांची चौकशी केली होती.
हिंदू संघटनांना मिळाली होती माहिती
बसमधून बेळगावला येणाऱ्या नागरिकांची माहिती हिंदू संघटनांना मिळाली. श्रीराम सेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यासंबंधीची माहिती बेळगाव पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी बसस्थानकावर धाव घेत हुबळीहून बेळगावला आलेल्या 28 जणांना ताब्यात घेतले.
पश्चिम बंगालमधील सुवर्ण कारागिर व इतर असल्याचे निष्पन्न
'त्या' सर्व 28 जणांना माळमारुती पोलीस स्थानकात नेऊन त्यांची ओळखपत्रे, आधारकार्ड व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यांच्या हातांच्या ठशांचे नमुनेही घेण्यात आले. पडताळणीअंती ते बांगलादेशी घुसखोर नसून पश्चिम बंगालमधून आलेले सुवर्ण कारागिर व इतर कामगार असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.
घुसखोर नसल्याचे समजताच सुटका
28 पैकी 23 जण गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शहापूरमध्ये राहतात. व्यवसायाने ते सुवर्ण कारागिर आहेत. तर पाच कामगार चिकोडीला जाण्यासाठी बेळगावला आले होते. शहापूर, वडगाव परिसरात हे कारागिर वास्तव्य करून असलेल्या ठिकाणी व कामाच्या ठिकाणीही त्यांच्याविषयी चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी या कामगारांनी आपण बांगलादेशी नसून पश्चिम बंगालमधील सुवर्ण कारागिर असल्याचे सांगितले होते. मतदानासाठी पश्चिम बंगालला गेल्याचीही माहिती दिली होती. त्यांच्या बोटावरील मतदानाची शाईही अजून होती. चौकशीअंती ते बांगला घुसखोर नसल्याचे लक्षात येताच त्यांची सुटका करण्यात आली.
बांगलादेशी घुसखोरांना भारतात आणणारे जाळेच पश्चिम बंगालमध्ये कार्यरत
नऊ वर्षांपूर्वी माळमारुती पोलिसांनी 12 बांगला घुसखोरांना अटक केली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बांगलादेशला तडीपार करण्यात आले होते. सध्या लोकायुक्त विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी महांतेश्वर जिद्दी, माळमारुतीचे सध्याचे पोलीस निरीक्षक व त्यावेळचे पोलीस उपनिरीक्षक बी. आर. ग•sकर आदी अधिकाऱ्यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. अटक केलेल्या बांगलादेशींना हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. बांगलादेश दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी 19 जून 2017 रोजी कारागृहाला भेट देऊन घुसखोरांची चौकशी केली होती. ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटवली होती. मोहम्मद बेपारी, अब्दुललाही गाज, रोहान शेख, हन्ना शाबरी, अकिब अली, हाफिजुल्ला, अंजुम बेग ही त्यापैकी काही नावे आहेत. बांगलादेशी घुसखोरांना भारतात आणणारे जाळेच पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहे. पैसे घेऊन वेगवेगळ्या शहरात त्यांना कामाला जुंपण्यात येते. या घटनेनंतर बांगला घुसखोरांचा मुद्दा बेळगावात पुन्हा ठळक चर्चेत आला आहे.
खळबळ…!
घडलेल्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ
मतदान करण्यासाठी गेले होते पश्चिम बंगालला
गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शहापूरमध्ये वास्तव्य

