पुणे प्रतिनिधी :
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून दोन्ही ठिकाणी प्रस्थापित नेतृत्वाला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे दिसून आले. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत नवा इतिहास रचला, तर राहुरीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय नोंदवला.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2 लाख 18 हजार 806 मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. हा बारामतीच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्याचा विजय ठरला आहे. याआधीचा विक्रम दिवंगत अजित पवार यांच्या नावावर होता. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 1 लाख 65 हजार 265 मतांनी विजय मिळवला होता. तो विक्रम आता मागे पडला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच बारामतीत एकतर्फी लढत पाहायला मिळाली. एकूण 24 फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार यांनी सातत्याने आघाडी कायम ठेवली. या पोटनिवडणुकीत 58.17 टक्के मतदान झाले होते. 2 लाख 23 हजार 705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अक्षय कर्डिले यांचा 1 लाख 11 हजार 826 मतांनी विजय
दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी 1 लाख 11 हजार 826 मतांच्या फरकाने विजय मिळवला. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत कर्डिले यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्याशी झाला होता. दोन्ही मतदारसंघांतील निकालांमधून मतदारांनी विकासकामांवर आणि स्थिर नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून कर्डिले आघाडीवर होते. प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत गेले.
26 व्या फेरीअखेर त्यांनी 1 लाख मतांचा टप्पा ओलांडत विरोधकांचा सुपडा साफ केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला.निकाल जाहीर होताच राहुरीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाके आणि घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले. कार्यकर्त्यांनी अक्षय कर्डिले यांना खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला.
पवार 'पॉवर' आणि सहानुभूतीची लाट
बारामतीच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र पार्थ व जय पवार यांनी मोठी ताकद लावली होती. याशिवाय शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयांची साथ सुनेत्रा वहिनींना मिळाली. महायुतीची एकी व विरोधकांचे सहकार्य यामुळे मताधिक्य वाढले. किंबहुना, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा या निवडणुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.

