Dailyhunt
बेळगावमधील साहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती

बेळगावमधील साहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती

350 शाळांचा समावेश, जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी

बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 350 साहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदाची संधी मिळाली आहे. बुधवारी क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात झालेल्या कौन्सिलिंगमध्ये मराठी, ऊर्दू व कन्नड प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली.

यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. मागील तीन ते चार वर्षांपासून बढतीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार साहाय्यक शिक्षकांना प्रभारी मुख्याध्यापकपदी नेमणूक देण्यात आली होती. शाळेला कायमस्वरुपी मुख्याध्यापक नसल्याने प्रभारी मुख्याध्यापकांवरच शाळेचा गाडा हाकला जात होता. कायमस्वरुपी मुख्याध्यापक नसल्याने अनेक कामांवर निर्बंध येत असल्याने बढतीसाठीचे कौन्सिलिंग तातडीने घ्यावे, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात होती.

जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने बुधवारी बढतीसाठीचे कौन्सिलिंग घेण्यात आले. 68 मराठी शाळा, 18 ऊर्दू तर 265 कन्नड शाळांचा यामध्ये समावेश होता. सेवाज्येष्ठतेनुसार साहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी बढती देण्यात आली. त्यामुळे बुधवारी सकाळपासून क्लब रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी गर्दी झाली होती. जिल्हाशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कौन्सिलिंगची प्रक्रिया पार पडली. कोठेही गोंधळ अथवा तांत्रिक दोष निर्माण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. सायंकाळपर्यंत 350 शिक्षकांचे कौन्सिलिंग पूर्ण झाले. यामुळे आता सरकारी प्राथमिक शाळांना कायमस्वरुपी मुख्याध्यापक मिळाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat