Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बेंगळुरात इस्पितळाची संरक्षक भिंत कोसळून 8 ठार

बेंगळुरात इस्पितळाची संरक्षक भिंत कोसळून 8 ठार

चारजण जखमी : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

बेंगळूर : बेंगळूर शहराला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. दरम्यान, शिवाजीनगरमधील बौरिंग आणि लेडी कर्झन इस्पितळाची संरक्षक भिंत कोसळून तीन मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. प्राथमिक माहितीनुसार, बौरिंग इस्पितळाच्या आपत्कालीन विभागाजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने रस्त्यावरील फुटपाथवर व्यापार करणाऱ्या तीन मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला. संरक्षक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली 10 हून अधिकजण अडकले होते. तेव्हा तेथील पादचारी आणि वाहनधारकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून त्यापैकी काहींना वाचविले.

 सहाजणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांनी इस्पितळात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मृतदेह शवागारात हलविण्यात आले. तबीन ताज (वय 47), मुबीन ताज (वय 49), माया (वय 51), साजिद (वय 20), अजू (वय 35), प्रीती (वय 5), सिजी (वय 47) अशी मृतांची नावे आहेत. आणखी मृताचे नाव समजू शकले नाही. इस्पितळाची संरक्षक भिंत नव्याने बांधली जात होती. काही लोक जुन्या भिंतीला लागून रस्त्याच्या कडेला मोठी ताडपत्री तुकडा लावून व्यापार करत होते. सायंकाळी सुरू झालेल्या पावसामुळे जीर्ण झालेली संरक्षक भिंतअचानक कोसळली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. बंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग आणि शिवाजीनगर पोलीस स्थानकाच्या पेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती गोळा केली.

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

संरक्षक भिंत कोसळ्याचे कारण काय, याचा तपास करून अहवाल सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून फैलावर घेतले. त्याचप्रमाणे बौरिंग इस्पितळातील अतिदक्षता विभागात जखमींची विचारपूस केली. जखमींवरील उपचारात कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश त्यांनी डॉक्टरांना दिले. जीर्ण झालेली संरक्षक भिंत तुमच्या नजरेला पडली नाही का? तुमच्यात को-ऑर्डिनेशन नाही का?, खबरदारी घेतली असती तर दुर्घटना टळली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat