Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बेटिंग प्रकरणी बाळकृष्ण तोपिनकट्टीच्या घरावर छापा

बेटिंग प्रकरणी बाळकृष्ण तोपिनकट्टीच्या घरावर छापा

मुरलीधर कॉलनीत कारवाई : सीसीबी-मार्केट पोलिसांची संयुक्त मोहीम : रोख रकमेसह सीपीयु, मॉनिटर, मोबाईल जप्त

बेळगाव : आयपीएल क्रिकेट सामन्यावरील बेटिंग प्रकरणी मुरळीधर कॉलनी येथील बाळकृष्ण तोपिनकट्टी याच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.

रविवारी रात्री सीसीबी व एपीएमसी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून बाळकृष्णवर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बाळकृष्ण गोपाल तोपिनकट्टी (वय 48) राहणार मुरळीधर कॉलनी हा आपल्या घरी बेटिंग घेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

त्याच्या घरातून पाच सीपीयु, तीन मॉनिटर, एक मोबाईल, एक हेडफोन, दोन कीपॅड, दोन माऊस, 60 हजार 800 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, आडव्याप्पा रामगोंनट्टी, जगदीश हादिमनी, सिद्धारुढ मुगळखोड, रिटा लाड, एफ. बी. मुजावर, व्ही. पी. बुदनावर, नंदा शिगीहळ्ळी, हणमंत खोत, नामदेव लमाणी आदींनी भाग घेतला.

बाळकृष्ण तोपिनकट्टीला ताब्यात घेऊन त्याच्या घरात सापडलेले सीपीयु, मॉनिटर, मोबाईल, हेडफोन, रोकड आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात बेटिंग घेण्यात येत होते. सीसीबीच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. आतून बेटिंगचे काम सुरू होते. पोलिसांनी बाळकृष्णला ताब्यात घेऊन त्याच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 78(1)(ए)(5) अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat