Dailyhunt
भारत यू-20 महिला संघाची तैपेईवर मात

भारत यू-20 महिला संघाची तैपेईवर मात

2004 नंतर एएफसी आशियाई चषकातील पहिला विजय

वृत्तसंस्था, पथुम थानी

एफसी यू-20 महिला आशियाई चषकात भारतीय यू-20 महिला संघाने चीन तैपेईचा 3-1 असा पराभव केला. या स्पर्धेतील 2004 सालानंतरचा हा पहिला विजय आहे.

सिबानी देवी नोंगमेईकापमने दोन गोल केले. (ज्यामध्ये एका पेनल्टीचा समावेश आहे) तर भूमिका देवी खुमुकचमने भारतासाठी आणखी एक गोलाची भर घातली. या विजयामुळे भारत क गटात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचे त्यांचे भवितव्य आता जॉर्डन आणि उझबेकिस्तान यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.

जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर 'यंग टायग्रेसेस'ने (भारतीय संघाने) आपल्या कामगिरीत सुधारणा दर्शवली आणि चीन तैपेईविरुद्ध आक्रमक खेळाचे जोरदार प्रदर्शन घडविले.

भारतीय यू-20 महिला संघाने बुधवारी क गटातील आपल्या अखेरच्या सामन्यात चीन तैपेईचा 3-1 ने पराभव करत एएफसी यू-20 महिला आशियाई चषक 2026 च्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. भारताची आघाडीची खेळाडू सिबानी देवी नोंगमेईकापमने 32 व्या आणि 87 (पेनल्टी) व्या मिनिटाला असे दोन गोल केले. त्यापूर्वीच भूमिका देवी खुमुकचमने 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला सामन्याच्या सुरूवातीलाच आघाडी मिळवून दिली होती. चीन तैपेईसाठी बदली खेळाडू काओ सिन (90+3) हिने एक गोल करत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. यू-20 महिला आशियाई चषकामध्ये 2004 नंतर भारताचा हा पहिलाच विजय होता.

या निकालासह भारताने क गटातील तीन सामन्यांतून तीन गुण मिळवत तिसरे स्थान पटकाविले. आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना ब गटातील जॉर्डन आणि उझबेकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहणे आवश्यक आहे. सर्व गटामधील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांपैकी सर्वोत्तम दोन संघांपैकी एक म्हणून पात्र ठरण्यासाठी त्यांना या निकालाची गरज आहे. जपान (0-6) आणि ऑस्ट्रेलिया (0-5) यांच्याविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर यंग टायग्रेसेस' चीन तैपेईविरुद्ध आपले नशीब बदलण्यास उत्यंत उत्सुक असल्याचे दिसून आले.

सामन्याची ठळक वैशिष्ट्यो

सामन्याच्या 26 व्या मिनिटालाच भारताने पहिला गोल करत आघाडी घेतली. सिबानीने उजव्या बाजुने एक क्रॉस (चेंडू) आत टाकला. जो ल्हिंगदेईकिम आणि सुलंजना राऊल या दोघींनाही गाठता आला नाही. मात्र दूरच्या खांबापाशी धावत आलेल्या आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या निगराणीत नसलेल्या भूमिकाने चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच त्यावर जोरदार प्रहार केला. चेंडू एका बचावपटूच्या अंगाला लागून थेट गोलजाळीत विसावला. त्यानंतर लगेचच सिबानीने गोल केला. जेंव्हा तिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत उसळत्या चेंडूवर डोक्याने प्रहार केला. ती झुंज जिंकल्यानंतर ती वेगाने बॉक्समध्ये घुसली आणि तिने डाव्या पायाने एक हाफ व्हॉली शॉट मारला. ज्याने दूरच्या पोस्टवर उभ्या असलेल्या गोलकीपरला चकवले. सामन्याची गती पूर्णपणे आपल्या बाजूने असल्याने भारताने एकापाठोपाठ एक हल्ले चढवत जोरदार मुसंडी मारली.

चीन तैपेईने त्यांच्या बॉक्समध्ये हँडबॉल केल्3यामुळे भारताला सामन्याच्या अखेरीस पेनल्टी मिळाली. जी सिबानीने 87 व्या मिनिटाला गोलमध्ये रुपांतरित केली. यामुळे निकालाविषयी कोणतीही शंका उरली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat