Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताचे जपानशी 'मेगा' करार

भारताचे जपानशी 'मेगा' करार

संरक्षण, एआयसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य, दोन्ही देशनेत्यांची भेट

सहकार्याची कक्षा वाढविणार…

  • विविध आर्थिक आणि संरक्षणविषयक क्षेत्रांमध्ये दोन्ही एकत्र काम करणार
  • भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जपान आर्थिक सहकार्य देणार
  • सेमीकंडक्टर, औषधनिर्मिती, शस्त्रनिर्मिती या क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रयत्न होणार

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आणि जपान यांच्यात महत्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता, दुर्मिळ धातू, आरोग्य, ऊर्जानिर्मिती आणि आर्थिक सुरक्षा या क्षेत्रांमध्येही मोठे करार करण्यात आले आहेत. जपान भारतात 1 हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. हे सर्व करार 16 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. जपानच्या नेत्या साने ताकाईची सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळाची भारताच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. ही चर्चा विविध द्विपक्षीय संबंधांवर झाल्याचे समजते.

 शिखर परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साने ताकाईची यांच्यात गुरुवारी द्विपक्षीय संबंधांवर शिखर परिषद घेण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास आणि हस्तांतरण हा या परिषदेचा सर्वात महत्वाचा विषय होता. संरक्षण तंत्रज्ञान विकासापासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता विकासापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि जपान यांच्यात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध योजनांवर वेगाने काम केले जाणार आहे.

संरक्षण कराराचे महत्त्व

जपान तंत्रज्ञान विकासात जगातील महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. हा देश आता संरक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकास करीत आहे. भारतही संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांसाठी या क्षेत्रात लाभदायक ठरु शकतात. जपानच्या उच्च तंत्रज्ञानाचा भारताची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जपानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे भारताच्या युद्धनौकांना शत्रूच्या रडारपासून संरक्षण मिळू शकते. तसेच, ड्रोन्सनिर्मिती आणि क्षेपणास्त्र निर्मितीतही जपान आणि भारत यांनी एकमेकांशी निकटचे सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'युनिकॉर्न'ची निर्मिती करणार

भारत आणि जपान यांनी एकत्रितरित्या 'युनिकॉर्न' नामक युद्धनौका अँटेना विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे भारताच्या युद्धनौकांची 'गुप्त' राहण्याची क्षमता वाढणार आहे. भारत आणि जपान यांनी इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा संरक्षण करार केला आहे. तसेच, सेमीकंटक्टर निर्मिती, भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता इकोसिस्टिम निर्माण करणे, क्वांटम तंत्रज्ञानाचा विकास, दुर्मिळ धातूंच्या उत्पादनाशी संबंधित तंत्रज्ञान, वेगवान प्रवास तंत्रज्ञान, औषध निर्मिती आदी क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. हे तंत्रज्ञान स्वत:च्या देशांचे संरक्षण करणे, त्याचप्रमाणे जागतिक शांतता आणि जागतिक व्यवस्थेचा समतोल दृष्टीसमोर ठेवून विकसित केले जाणार आहे., अशीही माहिती शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

आर्थिक सुरक्षा

भारत आणि जपान यांच्यात झालेल्या शिखर परिषतेत आर्थिक सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करून दोन्ही देशांची आर्थिक उन्नती साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याला अनुसरून दोन्ही देश जैविक इंधनवायूच्या उत्पादनावर भर देणार आहेत. जपानच्या सहकार्याने भारतात एक हजारांहून अधिक जैविक इंधनवायू आणि जैविक खतनिर्मिती केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या प्रकल्पांसाठी जपान तांत्रिक सहकार्य आणि आर्थिक साहाय्य भारताला करणार आहे. तसेच, भारत-प्रशांतीय क्षेत्रात समतोल आणि शांतता रहावी, यासाठी दोन्ही देश एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहेत. भारतातील ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठीही जपान भारताला सहकार्य करणार आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे.

ताकाईची या भगिनीप्रमाणे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या नेत्या ताकाईची यांच्यासंबंधी प्रशंसोद्गार काढताना त्या माझ्या भगिनीप्रमाणे आहेत, असे भावोत्कट उद्गार काढले आहेत. भारताचा विस्तृतपणा आणि जपानची गुणवत्ता यांचा संगम झाल्यास मोठी प्रगती होऊ शकते. एकमेकांच्या समवेत काम करत दोन्ही देश जनतेला किफायतशीर दरात अत्याधुनिक वैद्यकीय उपचार देऊ शकतील, अशी भलावण त्यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat