सरसंघचालक मोहन भागवत यांचे न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये वक्तव्य
► वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' कार्यक्रमात भारताची विविधता, एकता, मानवता आणि आध्यात्मिक विकासावर आपले विचार मांडले.
एकता आणि विविधता भारताच्या डीएनएमध्ये असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. या कार्यक्रमाला 5,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांसह 30 देशांतील सुमारे 180 धार्मिक नेत्यांनीही सहभाग दर्शवला होता.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित 'एक जग, एक मानवता' परिषदेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य करत जगाला एकतेचा प्रभावी संदेश दिला. भारतात मुस्लिमांचे अस्तित्व नसावे, असे जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर ती व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणवू शकत नाही, असे भाष्य मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात केले. जगभरातील धार्मिक नेत्यांसमोर बोलताना त्यांनी सर्व धर्म एकाच देवाकडे घेऊन जातात, ही श्रद्धा हिंदू असण्याची प्राथमिक अट आहे. माणसांमध्ये कोणताही भेदभाव असू शकत नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर हाच मानवतेचा खरा पाया आहे, असेही ते म्हणाले. तसेच भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या 'डीएनए'मध्ये (मूलभूत रचनेत) एकता आणि विविधता सामावलेली आहे, असे प्रतिपादन करत दोन देशांमध्ये साम्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मानवता सर्व धर्मांच्या पलीकडे
लोकांचे कपडे, जीवनशैली, शरीर आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी, त्यांच्यात एक आंतरिक संबंध आहे. मानवता सर्व धर्मांच्या पलीकडे आहे आणि वेगवेगळे मार्ग शेवटी एकाच सत्याकडे घेऊन जातात. विविधतेत एकता साकार करण्याची आणि वेळोवेळी जगाला याची जाणीव करून देण्याची जबाबदारी भारताची असल्याचे नमूद करत त्यांनी मानवी जीवनातील आध्यात्मिक विकासाच्या महत्त्वावरही भर दिला. माणसांमध्ये विचार करण्याची क्षमता असणे हेच त्यांचे वैशिष्ट्या आहे. पण ते कोणत्या दिशेने विचार करतात हे महत्त्वाचे आहे. योग्य विचार त्यांना देवाच्या जवळ घेऊन जातो आणि चुकीचा विचार त्यांना पशूवृत्तीकडे नेतो, असा दाखलाही त्यांनी दिला.
एकनिष्ठ राहण्याची गरज
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे त्यांच्या कार्यभूमीप्रती एक कर्तव्य आहे आणि त्यांनी ते पूर्ण केलेच पाहिजे. त्यांनी आपल्या कार्यभूमीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. भारत ही त्यांची जन्मभूमी असल्यामुळे, जर त्यांना काही करण्याची इच्छा असेल, तर ते आपल्या कार्यभूमीप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करून ते करू शकतात; त्याला मनाई नाही. पण ते अनिवार्यही नाही, असे सरसंघचालक म्हणाले.

