भारताच्या आर्थिक विकासाची दखल : उच्च व्याजदरांवरून अमेरिकेच्या फेडरल बँकेवर टीका
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या 7 टक्के जीडीपी वाढीचे उदाहरण देत आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला म्हणजेच 'फेडरल रिझर्व्ह'ला लक्ष्य केले आहे.
अमेरिकेतील व्याजदर जास्त आहेत. जर हे दर कमी असते तर अमेरिकेचा आर्थिक विकासदर 15 ते 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हवर अति-राजकीय पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला. जेव्हा जेव्हा अमेरिकेला चांगली आर्थिक आकडेवारी मिळते, तेव्हा फेडरल बँग व्याजदर कमी करण्याऐवजी वाढवते. मात्र, मजबूत अर्थव्यवस्था पाहता व्याजदर कमी असायला हवेत, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील उच्च व्याजदरांमागे फेडरल रिझर्व्हची वृत्ती हे एक प्रमुख कारण असल्याचा दावाही त्यांनी केला. यात ते फेडच्या अध्यक्षांना थेट दोष देत नसले तरी, त्यांना संस्थेच्या निर्णयांमध्ये राजकीय प्रभाव दिसतो.
अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि कर्ज परतफेडीची क्षमता अधिक चांगली आहे. अशा परिस्थितीत, देशाला कमी व्याजदरांचा फायदा झाला पाहिजे. सध्याच्या धोरणांमुळे अमेरिका आपल्या पूर्ण आर्थिक क्षमतेचा वापर करू शकत नाही. जर व्याजदर कमी ठेवले असते, तर अमेरिकेचा जीडीपी वाढीचा दर 4 टक्क्यांऐवजी 15 ते 20 टक्के झाला असता. यामुळे देशाला आपले कर्ज अधिक वेगाने फेडण्यासही मदत झाली असती, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्ह यांच्यात दीर्घकाळापासून वाद
ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्ह यांच्यात अनेक वर्षांपासून व्याजदरांवरून मतभेद आहेत. ट्रम्प यांना बँकेची कर्जे स्वस्त करायची आहेत, जेणेकरून लोक अधिक खरेदी करू शकतील आणि कंपन्या आपला व्यवसाय वाढवू शकतील. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तथापि, व्याजदर कमी केल्याने लोकांना अधिक पैसे खर्च करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे मागणी वाढेल आणि महागाई वाढू शकते, असा फेडरल रिझर्व्हचा विश्वास आहे. त्यामुळेच महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेड व्याजदर कमी करत आहे.
…………….

