Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारतीय अंतराळ क्षेत्राला 'दृष्टी'चे वरदान

भारतीय अंतराळ क्षेत्राला 'दृष्टी'चे वरदान

भारताचा सर्वात मोठा खासगी उपग्रह 'दृष्टी' प्रक्षेपित : ऑप्टिकल आणि रडार तंत्रज्ञानाचा वापर करून छायाचित्रे घेण्याची क्षमता

वृत्तसंस्था/ फ्लोरिडा, बेंगळूर

भारतीय स्टार्टअप 'गॅलेक्स-आय' या बेंगळूरस्थित कंपनीने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह 'दृष्टी' प्रक्षेपित केला.

190 किलो वजनाचा दृष्टी हा भारताचा सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे. हा उपग्रह ऑप्टिकल आणि रडार (एसएआर) या दोन्ही तंत्रज्ञानाचा वापर करून एकाचवेळी प्रतिमा घेऊ शकतो. 'दृष्टी' हा उपग्रह संरक्षण, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, सागरी निगराणी आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनात मदत करेल. तसेच हा उपग्रह इस्रोच्या 29 पृथ्वी निरीक्षण उपग्रहांना पूरक ठरणार असल्याने देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात कमालीचा लाभ होणार आहे.

'दृष्टी' सर्व हवामानात उपग्रह प्रतिमा उपलब्ध करून देईल. आतापर्यंत, जगभरातील उपग्रह एकतर मल्टी-स्पेक्ट्रल/हायपर-स्पेक्ट्रल (ऑप्टिकल) प्रतिमा घेत असत किंवा एसएआर तंत्रज्ञानाचा वापर करत असत. ऑप्टिकल प्रतिमा अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोप्या असतात. एसएआर, किंवा सिंथेटिक अॅपर्चर रडार ढगांमध्ये, पावसात किंवा रात्रीच्या वेळीही प्रतिमा घेऊ शकतो. गॅलेक्सआयने या तंत्रज्ञानाला 'ऑप्टोसार' असे नाव दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलेक्सआय या स्टार्टअप कंपनीची या कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे.

गॅलेक्सआय कंपनीचे संस्थापक, सुयश सिंग यांच्या मते, पूर्वी अधिक चांगली माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपग्रहांकडून मिळालेला डेटा एकत्र करावा लागत होता. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी आणि कोनांमधून मिळणाऱ्या प्रतिमांमध्ये विसंगती निर्माण होत असे. मात्र, दृष्टी उपग्रह एकाच ठिकाणी, एकाच वेळी अचूक प्रतिमा प्रदान करेल. खराब हवामानात, जेव्हा ऑप्टिकल प्रतिमा उपलब्ध नसतात, तेव्हा कंपनी एसएआर डेटाचे ऑप्टिकल-सारख्या प्रतिमांमध्ये रुपांतर करण्यासाठी एआयचा वापर करू शकते. यामुळे सर्व हवामानात आणि सर्ववेळी प्रतिमा घेणे शक्य होईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

'दृष्टी'चे तंत्रज्ञान भारतासाठी अद्वितीय

या उपग्रहात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान पूर्वी विकसित केले गेले नव्हते. भारताला ढगाळपणाच्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत असल्यामुळे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. हा उपग्रह तयार करण्यामधील सर्वात मोठे आव्हान ऑप्टिकल आणि एसएआर तंत्रज्ञानामध्ये समन्वय साधणे हे होते. दोन्ही सेन्सर पृथ्वीला वेगवेगळ्या कोनांमधून पाहत असल्यामुळे कंपनीने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे जे दोन्ही एकाच वेळी एकाच ठिकाणच्या प्रतिमा घेऊ शकतात.

फायदा काय होणार?

आतापर्यंत बहुतांश उपग्रह एकतर ऑप्टिकल कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रे टिपत होते किंवा रडार तंत्रज्ञानाद्वारे. ऑप्टिकल कॅमेरे मोबाइल कॅमेऱ्याप्रमाणेच साफ छायाचित्रे उपलब्ध करतात. परंतु ढग किंवा रात्रीच्या वेळी ते उपयुक्त ठरत नाहीत. तर रडार तंत्रज्ञान अंधार आणि ढगांच्या पार पाहू शकते, परंतु त्याची छायाचित्रे तितकी साफ नसतात. 'दृष्टी'मध्ये पहिल्यांदा दोन्ही तंत्रज्ञानांना एकत्र जोडण्यात आल्यामुळे स्वच्छ छायाचित्रे प्राप्त होणार आहेत. शेतजमिनींची स्थिती, जमिनीतील बदल, नव्या इमारतींची निर्मिती किंवा वाहतूक यासारखी माहितीही हा उपग्रह टिपू शकतो. हा उपग्रह 1.8 मीटर रिझोल्यूशनपर्यंतची छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat