Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बोगद्यांमध्ये अडकलेत 537 कामगार

बोगद्यांमध्ये अडकलेत 537 कामगार

लविद्युत प्रकल्पांवरील बचावकार्याला वेग : पाईपद्वारे हवेचा पुरवठा ; भारताचेही सहाय्य

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलय आणि महापुरामुळे जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे.

पूरग्रस्त रसुवा आणि नुवाकोट जिह्यांमधील नऊ जलविद्युत प्रकल्पांमधील 537 कर्मचारी आणि कामगार अजूनही बेपत्ता आहेत. बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवरील चिखल आणि ढिगारे, खराब झालेली पायाभूत सुविधा, दुर्गम भूभाग आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. परिणामी, नेपाळने भारत, चीन आणि इतर देशांकडून विशेष तांत्रिक मदतीची मागणी केली आहे.

26 ऑगस्ट रोजी आलेल्या पुरानंतर दोन जिह्यांमधील नऊ जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या 898 अधिकारी आणि कामगारांचा संपर्क तुटल्याचे प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 361 जणांना वाचवण्यात आले आहे, तर 537 जण अजूनही बेपत्ता आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रसुवा येथील 216-मेगावॅट क्षमतेच्या अप्पर त्रिशुली-1 जलविद्युत प्रकल्पात सर्वात गंभीर परिस्थिती आहे. या प्रकल्पाच्या बोगद्यात सुमारे 300 लोक अडकल्याची भीती आहे. नुवाकोटमधील 60-मेगावॅट क्षमतेच्या अप्पर त्रिशुली-3ए जलविद्युत प्रकल्पातील बोगद्याचे प्रवेशद्वार चिखल आणि ढिगाऱ्यामुळे बंद झाल्यानंतर आता बचावकार्यात काही प्रमाणात प्रगती झाली आहे. येथे बचाव पथके यंत्रांच्या मदतीने माती आणि गाळ काढत आहेत. बोगद्यात 6-इंची छिद्र पाडून पाईपद्वारे हवेचा पुरवठा केला जात आहे. आता, या छिद्राचा विस्तार करून मॅनहोल बनवण्याची तयारी सुरू आहे. या मॅनहोलमधून बचाव पथके बोगद्यात प्रवेश करून अडकलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. बचाव पथके दुसऱ्या मार्गाने बोगद्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. पथकाला बोगद्याचा वरचा भाग सापडला असून तो उघडण्यासाठी यंत्रांच्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. एकदा मार्ग मोकळा आणि सुरक्षित झाल्यावर, बचाव पथक बोगद्यात प्रवेश करून शोधकार्य सुरू ठेवेल.

पुरामुळे आतापर्यंत 804 बळी

26 ऑगस्ट रोजी नेपाळमधील भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना अचानक पूर आला होता. या आपत्तीमुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 804 लोकांचा बळी गेला आहे, तर तिबेटमधील मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. तसेच विनाशकारी पुरामुळे झालेले नुकसान अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. तथापि, या टप्प्यावर नुकसानीचा अंदाज लावणे घाईचे ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दरम्यान, अनेक देशांनी नेपाळसाठी आर्थिक आणि मानवतावादी मदतीची घोषणा केली आहे.

भारताकडून नेपाळला 68.5 टन मदत साहित्य

पुरामुळे खराब झालेले रस्ते आणि पूल पुन्हा बांधण्यासाठी एकूण 42 बेली पूल बांधण्याकरिता नेपाळने भारत आणि चीनकडे मदतीची विनंती केली आहे. भारताने आतापर्यंत 68.5 टन मदत साहित्य पाठवले आहे. बोगद्यांमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बोगदा तज्ञ, न्यायवैद्यक तज्ञ आणि तांत्रिक पथकेही नेपाळला पाठवण्यात आली आहेत. भारताने ब्लँकेट्स, स्लीपिंग बॅग्ज, ताडपत्री आणि स्वच्छता किट यांसारखा मदत पुरवठा केला आहे. याशिवाय, 230 फूट लांबीच्या बेली पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्यही नेपाळला पोहोचवण्यात आले आहे. भारत लवकरच आणखी सात बेली पुलांसाठी साहित्य आणि तांत्रिक पथके पाठवणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat