Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चंद्रावर छुपे दोन विशाल ज्वालामुखी

चंद्रावर छुपे दोन विशाल ज्वालामुखी

अब्जावधी वर्षांच्या इतिहासाचे रहस्य उघड

चंद्राला पाहून तेथे दीर्घकाळापासून सर्वकाही शांत असल्याचे वाटते. परंतु वैज्ञानिकांना मिळालेल्या नव्या पुराव्यांनुसार अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्रावर भरपूर हालचाली होत्या.

वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 80 किलोमीटर रुंद दोन मोठ्या ज्वालामुखीय संरचना शोधल्या आहेत. त्यांची ओळख चंद्राची छायाचित्रे आणि त्याच्या पृष्ठभागाची उंचीवरून जमविण्यात आलेल्या आकडेवारीच्या मदतीने पटविण्यात आली आहे. हे दोन्ही शील्ड ज्वालामुखी असल्याचे मानले जात आहेत, जे कधी चंद्राच्या आतून निघणाऱ्या तप्त अन् वितळणारे खडक म्हणजेच मॅग्माने निर्माण झाले असतील.

यातील एक संरचना प्रिन्झ-हार्बिंगर भागात मिळाली असून ती सुमारे 70-80 किलोमीटर रुंद आहे आणि आसपासच्या जमिनीपासून सुमारे 239 मीटर उंच आहे. याच्या दरम्यान सुमारे 4 किलोमीटर रुंद एक ख•ा देखील आहे. हा एकेकाळी ज्वालामुखीचे मुख राहिला असावा असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागाच्या छायाचित्रांसोबत त्याच्या उंचीचा डाटाही अभ्यासला आहे. कुठल्याही जागेला ज्वालामुखी मानण्यासाठी केवळ त्याचा पर्वतासारखे दिसणे पुरेसे नाही. वैज्ञानिक त्यावरील उतार, आकार आणि आसपास असलेल्या लाव्हाच्या खुणाही पाहत असतात.

प्रिन्झ हार्बिंगर भागात अनेक वळणदार नालेही दिसून येतात, हे जुन्या काळात वाहणाऱ्या लाव्हारसपासून निर्माण झाले असावेत असे मानले जाते. 2025 च्या एका अध्ययनात या संरचनेची रुंदी जवळपास 78 किलोमीटर आणि उंची 239 मीटर सांगण्यात आली होती. याचा एकूण आकार जवळपास 898 घन किलोमीटर मानण्यात आला होता.

शील्ड ज्वालामुखी म्हणजे काय?

शील्ड ज्वालामुखी इतर ज्वालामुखींपेक्षा काहीसे वेगळे असतात, हे अत्यंत उंच आणि टोकदार नसतात, तर अत्यंत रुंद असतात आणि त्यांचा उतार कमी असतो. यातून निघणारा पातळ लाव्हारस दूरपर्यंत फैलावतो, हळूहळू हाच लाव्हारस एका मोठ्या अन् रुंद संरचनेचे रुप धारण करत असल्याने हे घडते. चंद्रावर यापूर्वीही अशा ज्वालामुखीय संरचना पाहिल्या गेल्या आहेत.

कधीकाळी ज्वालामुखीय हालचाली

चंद्रावर ज्वालामुखी असण्याची बाब नाही. त्याच्या पृष्ठभागावर अनेक मोठे काळ्या रंगाचे भाग दिसून येतात. वैज्ञानिकांनुसार यातील अनेक भाग अब्जावधी वर्षांपूर्वी वाहिलेला लाव्हारस थंड होऊन गोठल्यामुळे निर्माण झाले आहेत. प्रिन्झ हार्बिंगर भागातही जुना लाव्हारस आणि ज्वालामुखीय हालचालीच्या अनेक खुणा मिळाल्या आहेत. या संरचनांचे अध्ययन केल्यावर चंद्राच्या आत काय चालू होते हे समजून घेण्यास मदत मिळेल असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. तेथे मॅग्मा कसा तयार झाला आणि कशाप्रकारे पृष्ठभागापर्यंत पोहोचला हे देखील जाणून घेता येणार आहे.

अब्जावधी वर्षांपूर्वीचा इतिहास

वैज्ञानिकांनुसार प्रिन्झ-हार्बिंगर भागात ज्वालामुखीय हालचाली सुमारे 3.4 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या असू शकतात. आसपासच्या लाव्हा मैदानाचे वयोमान समारे 3.5 अब्ज वर्षे सांगण्यात आले आहे. सध्या शांत दिसणारा चंद्र स्वत:च्या प्रारंभिक काळात अत्यंत सक्रीय होता, तेथे ज्वालामुखींचा विस्फोट व्हायचा, लाव्हारस वाहत होता आणि हळूहळू त्याच्या पृष्ठभागाचा मोठा हिस्सा होत गेला असे या शोधातून स्पष्ट होते. या जुन्या ज्वालामुखींची माहिती वैज्ञानिकांना चंद्राच्या इतिहासाला चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat