Dailyhunt
चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?

चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी?

बेळगाव : वाहतूक कोंडी चुकवण्यासाठी वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. शहरातील जुने गांधीनगर ब्रिजपासून सम्राट अशोक चौकापर्यंत विरुद्ध दिशेने वाहने चालवली जात आहेत.

विशेष म्हणजे खासगी वाहनांसोबत परिवहन मंडळाच्या बसेसदेखील विरुद्ध दिशेने येत असल्याने प्रवाशांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावर शहरात येणारी वाहने जुने गांधीनगर ब्रिजपासून सम्राट अशोक चौक येथे येतात. त्यामुळे बऱ्याच वेळा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सम्राट अशोक चौकापासून हॉटेल संगमपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्या चुकवण्यासाठी वाहनचानक विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत. केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी वाहनेही विरुद्ध दिशेने चालवली जात आहेत. समोरून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अनेकवेळा अपघातही होत आहेत.

सोमवारी खासगी वाहनांसोबतच एक परिवहन मंडळाची बसदेखील प्रवासांच्या जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे हा धोकादायक प्रवास नेमका कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित चालकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat