Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देखणे ते सापळे

देखणे ते सापळे

पला जोडीदार आपल्या कल्पनेशी साधर्म्य दाखवणारा नसला म्हणजे संसार सुखाचा होत नाही असंही नसतं. कारण संसार सुरू केल्यानंतर आपल्याला त्यातली लज्जत कळत असते. ती सर्वस्वी अनोळखी असलेली व्यक्ती ज्या वेळेला सर्वार्थाने जवळची म्हणून आयुष्यात येते त्या वेळेला तिला समजून घेताना, तिच्याशी जुळवून घेताना, स्वत:चेही नवीन पैलू आपल्याला कळत असतात.

त्यामुळे संसार बहुत अलग बात होती है.

याल-ए-यार कुछ इस तरह गूँजा है दिल में,

कि जैसे तूने सरे-आम पुकारा हो मुझे।

अशी काही काहीवेळा अवस्था होते की आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण आपल्याला इतकी तीव्र येते की जणू काही ती व्यक्ती आपल्याला हाकच मारीत असावी. बऱ्याचदा जिला आठवण येते ती भ्रमात असते. उलट सुलट विचार तिच्या मनात येत असतात. आपल्याला त्याची इतकी आठवण येते. त्यालाच आपल्याविषयी काय वाटत असेल की नाही कोण जाणे! प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं. पण आजकालच्या भाषेत ज्याला क्रश किंवा सोलमेट म्हणतात ती अशी व्यक्ती असते की जी असं म्हणतात की आयुष्यात कुठल्या वळणावर कधी भेटेल हे सांगता येत नाही. आणि क्रश म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून एक आकर्षण असतं. जग प्रचंड जवळ आलेलं आहे. कामाचे तास प्रत्येकाचे वाढलेले असतात. त्यामुळे बराचसा वेळ माणूस बाहेरच असतो. याला अपवाद पुरुष किंवा स्त्राr यांच्यापैकी कोणीच नाही. त्यामुळे बाहेर समाजात वावरताना काही भावबंध निर्माण होणे फारच स्वाभाविक क्रिया ठरते. अशावेळी आपली चाकोरी ठरलेली आहे आणि आपण त्यावरून वाटचाल करीत आहोत. त्याच्या सीमा ओलांडता येणं शक्य नाही. हे माहीत असून सुद्धा काही निर्विष आकर्षणं ही विकसित होतच राहतात. तशी ती विकसित होण्यात मोठी गंमत असते. कामाच्या ठिकाणी सतत वावरताना एखादी व्यक्ती विलक्षण आवडून जाते. हे आवडणं दरवेळी ओंगळवाणंच असेल असं काहीही नसतं. ते एक नितांतसुंदर असं आकर्षण असतं. काही वेळा तो मोह असतो. ज्याच्या सहवासाची सवय होते त्याच्या सवयी ओळखीच्या होतात. लकबी माहीत होतात. अशावेळी ज्या माणसांकडून एकमेकांच्या स्पेसचा, बुद्धिमत्तेचा, विचारांचा आदर केला जाईल त्यांच्यादरम्यान नैसर्गिक आकर्षण निर्माण होणे यात योग्य की अयोग्य असं काहीच ठरवता येत नाही. खरंतर समाजाला घालून दिलेली बंधनं ती समाजाचा गाडा सुरळीत चालावा यासाठी असतात. परंतु मन हे मुक्त असतं. त्यामुळे मनात काय आणि कोणते विचार यावेत हे नियंत्रित करणं जवळपास अशक्यच असतं. एकदा सवय झाली की ती व्यक्ती जर समोर दिसली नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. पण बराच काळ जर का भेट झाली नाही तर मात्र अशी अवस्था होऊन जाते की,

वो जख्म दिए हैं तेरी याद की शिद्दत ने,

कि अब तेरी कुर्बत के मरहम भी

काम नहीं आते।

अर्थात खरं म्हणाल तर हे सगळं होण्यासाठी ती व्यक्ती आपल्या रोजच्या आयुष्यातीलच हवी असेही नाही. कित्येकदा अचानक एखाद्या ठिकाणी योगायोगाने भेटलेली व्यक्ती आवडून जाते. मग पुढे तिची भेट कितीवेळा होते याचा हिशोब करायची गरज नाही. कारण आपण मनात एक अरूपाचं रूप रंगवीत बसलेलो असतो. त्या रूपाला जुळणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल आणि आपली जोडीदार होईल असं काही नसतं. आपला जोडीदार आपल्या कल्पनेशी साधर्म्य दाखवणारा नसला म्हणजे संसार सुखाचा होत नाही असंही नसतं. कारण संसार सुरू केल्यानंतर आपल्याला त्यातली लज्जत कळत असते. ती सर्वस्वी अनोळखी असलेली व्यक्ती ज्या वेळेला सर्वार्थाने जवळची म्हणून आयुष्यात येते त्या वेळेला तिला समजून घेताना, तिच्याशी जुळवून घेताना, स्वत:चेही नवीन पैलू आपल्याला कळत असतात. त्यामुळे संसार बहुत अलग बात होती है. पण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक वात्रट प्रेमी दडलेला असतो. म्हणून मग आयुष्यात येणारी आकर्षणं आपल्याला गुंडाळून टाकतात इतकंच! अगदी प्रेमविवाह असेल तरीसुद्धा आयुष्य जगताना आपण इतके दमलेले असतो की एकेकाळी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या व्यक्तीशी बोलायला सुद्धा आपल्याला मिळत नसतं. किंवा संसारिक गोष्टीतून नात्यांमध्ये तोचतोचपणा येतो. रुसवेफुगवे, भांडणं, दुसऱ्या कोणाचा तरी राग आपल्या जोडीदारावर काढणं, हे ओघाने होत जातं आणि नात्यांमध्ये एक प्रकारची अढी पडत जाते. मग सगळं काही आपल्याकडे असून सुद्धा आपल्याला उगीचच असं वाटायला लागतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय. याच्यावरच किंवा हिच्यावरच प्रेम केलं होतं ना? मग हा किंवा ही अशी का वागते? आपल्या जोडीदाराचं आपल्यावर असणारं प्रेम आटलं की काय? एकाएकी अशा शंभर शंका आपल्याला येतात. विशेषत: स्त्रियांना तर त्यांच्या प्रौढवयात फार वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात. त्यामुळे अशा भावनांचं थैमान त्यांच्या डोक्यात जास्त प्रमाणात असतं. पुरुष या वयात करिअरमध्ये स्थिरावलेले असतात. बायको घरातल्यांचं, मुलाबाळांचं करून अतिशय वैतागलेली असते. तिला ज्या वेळेला अपेक्षा असतात त्यावेळेला आपण कधीही वेळ दिलेला नसतो आणि मग बायको पहिल्यासारखी फ्रेश नाही, सदैव चिडचिडलेली असते म्हणून बाहेरची आकर्षणं मोह घालायला लागतात. अशी प्रवृत्ती बाळगणं मात्र गंभीर चूक ठरू शकते. कारण एक सहज साधा विचार केला तरी बायको आपल्याशी लग्न झालं त्यावेळेला जर इतकी छान आणि फ्रेश होती आणि नंतर ती चिडचिडी झाली असेल तर ती आपणच तिला दिलेली देणगी आहे, हे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. तुम्ही जसं तिला वागवता तेच प्रतिबिंब तिच्या व्यक्तिमत्त्वावर पडतं इतका साधा विषय कित्येक पुरुष विसरतात. भांडणं कोणामध्येही होतातच. परंतु जसा काळ जाईल तसं ते प्रेम मॅच्युअर झालं पाहिजे. पण प्रेम करून हौसेने घरात आणायचं आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकवून दमवून टाकायचं आणि पुन्हा मग बायको आपल्याला वेळ देत नाही म्हणून बाहेर आकर्षणांना बळी पडत राहायचं असं करणारा मोठा पुरुष वर्ग आपल्या समाजात आहे. या दुटप्पीपणामुळेही अशा स्त्रियांच्या समोर मोहाचं भलं मोठं जाळंच्या जाळं निर्माण होतं. कारण त्यांना फारसं काही नको असतं. संसारिक कारणांनी त्या थकलेल्या असतात. जबाबदाऱ्या घेऊन त्या दमलेल्या असतात. त्यांनी आयुष्यात केलेल्या मेहनतीला तोड नसते. त्यांना फक्त एक छोटीशी दाद हवी असते. लगेच त्या वाहून जात नाहीत. पण ती यायला हवी तिथून न आल्यामुळे हे सगळं घडतं हे खरं. जिथे नवरा बायकोमधलं नातं हे स्वच्छ आणि मोकळं असेल तर एकमेकांच्या कामाच्या ठिकाणच्या गमतीजमती ते एकमेकांशी आवर्जून शेअर करतात. मग त्यांच्यामधली अशी कोणतीही गोष्ट नसते की जी कुणीही त्यांच्या नकळत जाऊन एकमेकांना सांगेल. त्यांना कामाच्या ठिकाणी भेटणारी अशी जी फुलपाखरं असतात त्या फुलपाखरांच्या गोष्टी एकमेकांना सांगून नवरा बायको मस्त एन्जॉय करू शकतात. कारण त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो. आकर्षण ही गोष्ट नैसर्गिक म्हणून त्यांनी घेतलेली असते. त्यातून त्या संशयाचा बागुलबुवा कधी उभा करीत नाहीत. शिवाय अशी आकर्षणं माणसाला आयुष्यात तरुण ठेवायला उपयोगी पडतात.

अजूनही आपण इतके छान दिसतो की लोक आपल्या प्रेमात पडू शकतात. ही भावना इतकी सुखद असते की माणसाला आपोआप दहा वर्षांनी तरुण करून जाते आणि याचा उपयोग पती-पत्नीमधले संबंध सुधारण्यासाठीच होतो. पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला ते तयार होतात. नात्यांमध्ये तेवढी पारदर्शकता मात्र पाहिजे असते. त्यामुळे आकर्षण येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आकर्षण वाटणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. मोह सुंदर असतो. मोहाचा बळी होणं वाईट! सापळासुद्धा अतिशय देखणा असू शकतो किंबहुना तो तसा असणंच आवश्यक असतं. फक्त तो देखणा असला तरी सापळा आहे याची जाणीव राहिली की तेवढं पुरे!

अॅड.अपर्णा परांजपे-प्रभु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat