तारिक रहमान आता स्वत:च भारत दौऱ्याच्या तयारीत : भारत-बांगलादेश संबंधांमधील तणाव दूर होणार
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध पुन्हा सामान्य होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर येण्याची योजना आखत असल्याची चर्चा आहे.
मात्र या दौऱ्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतासोबतच्या संबंधांवरून प्रथम उत्साह न दाखविणारे तारिक रहमान आता भारताचा दौरा करून तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वृत्तसंस्था, ढाका
सीमेवरील तणाव, तीस्ता नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा, चीनशी बांगलादेशची वाढती जवळीक आणि पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारताने दिलेला आश्रय या मुद्द्यांमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यापूर्वी भारताकडून तारिक रहमान यांना दोन स्वतंत्र निमंत्रणं देण्यात आली होती, मात्र त्यांनी भारत दौरा करणे टाळले होते.
नोव्हेंबर अखेर दौरा
तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या दाखल्यानुसार काही अडचणींनंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरू झाला असून रहमान यांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या संभाव्य बैठकींचा अजेंडा निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नसला तरीही हा दौरा नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या प्रारंभी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तारिक रहमान यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान तारिक रहमान हे 21 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त तारिक रहमान यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदींनीही त्यांच्या शुभेच्छांना उत्तर देत आभार मानले. दोन्ही नेत्यांमधील या संवादाकडे भारत-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधले गेले.
संबंध सुधारण्याची इच्छा
ब्रिक्स शिखर परिषदेनंतर बांगलादेशने भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बांगलादेशचे विदेश राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी भारतासोबत नव्या संबंधांकडे वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही देशांमधील संबंध बहुपक्षीय मंचाऐवजी द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातू पुढे नेले पाहिजेत.
भारताकडून दोन स्वतंत्र निमंत्रणं
तारिक रहमान यांना भारताकडून दौऱ्यासाठी दोन स्वतंत्र निमंत्रणं देण्यात आल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले होते. यातील एक निमंत्रण द्विपक्षीय चर्चेसाठी तर दुसरे ब्रिक्स शिखर परिषदेसाठी होते. बांगलादेश ब्रिक्सचा सदस्य नसला तरी तो सध्या बिम्सटेकचा अध्यक्ष आहे. त्यामुळे अध्यक्ष या नात्याने त्याल ब्रिक्स शिखर परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी तारिक रहमान यांना केवळ ब्रिक्स परिषदेसाठीच निमंत्रण देण्यात आल्याचा दावा फेटाळला होता. दोन्ही निमंत्रणं स्वतंत्रपणे देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

