कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान किंवा 'एआय' कोणकोणत्या क्षेत्रात प्रवेश करु शकते, या संबंधी जगभरात बरीच चर्चा केली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होईल, असेही मानले जाते.
एआयची नेमकी व्याप्ती आणि प्रभाव या संदर्भात सध्या अनिश्चिततेचे वातावरण असून या तंत्रज्ञानाचा नेमका परिणाम लक्षात येण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल, असे तज्ञांचे मत आहे. तथापि, ब्रिटनमध्ये अशी घटना घडली आहे, की जी सर्वांना विचार करायला लावणारी आहे. येथे एका नागरीकाने लक्षावधी रुपयांचे एका न्यायालयीन प्रकरणात वकीलांच्या साहाय्याने नव्हे, तर एआयच्या साहाय्याने विजय मिळविला.
व्रेग टिटचेनर असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीने 52 लाख रुपयांची एक लॉटरी जिंकली होती. त्याने ही रक्कम आपल्या मैत्रिणीला गुंतवणूक करण्यासाठी दिली होती. या गुंतवणुकीतून जो लाभ होईल, तो निम्म निम्मा वाटून घेण्याचे या दोघांनी ठरविले होते. तथापि, काही काळानंतर दोघांचे संबंध बिघडले. या ब्रेकअपनंतर त्याच्या मैत्रिणीने त्याला त्याने गुंतवणूक करण्यासाठी दिलेले पैसे परत करण्यास नकार दिला. तसेच लाभातील वाटाही दिला नाही. परिणामी, हे प्रकरण न्यायालयात गेले. टिटचेनर यांनी वकील नेमण्याचा प्रयत्न केला. तथापि, वकीलांची फी फार मोठी होती. त्यामुळे त्याने चॅटजीटीपी नामक कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे साहाय्य घेण्याचा निर्णय घेतला. तो त्याला चांगलाच लाभदायक ठरला.
चॅटजीपीटीने त्याला न्यायालयीन कागदपत्रे कशी सज्ज करायची, कोणते मुद्दे मांडायचे, ते कसे न्यायालयात सादर करायचे, साक्षी पुरावे कसे सादर करायचे आणि विरुद्ध बाजूच्या साक्षीदारांची कशी उलटपतासणी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार त्याने सर्व सज्जता केली. न्यायालयात त्याने स्वत:च स्वत:ची बाजू मांडली. एआयच्या साहाय्याने त्याने ही सर्व प्रक्रिया योग्यरित्या पार पाडली आणि या प्रकरणात न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला. अशा प्रकारे त्याने एआयच्या साहाय्याने हा विजय मिळविला. जगातील अशी ही प्रथम घटना मानली जात आहे. यामुळे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा आणखी एक उपयोग पुढे आला.

