Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एप्रिलमध्ये वाहन विक्रीत चांगले प्रदर्शन

एप्रिलमध्ये वाहन विक्रीत चांगले प्रदर्शन

टाटा, ह्युंडाई, महिंद्राच्या वाहनांची आकडेवारी जाहीर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

व्या आर्थिक वर्षात पहिला महिना एप्रिल भारतीय ऑटो उद्योगासाठी चांगला राहिला आहे. देशातील विविध कार उत्पादक कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे.

टाटा मोटर्स, ह्युंडाई मोटर आणि महिंद्रा आणि महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्यांनी कार विक्रीमध्ये समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. एसयूव्ही गटामध्ये मागणी सातत्याने वाढते आहे. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या कार कंपन्यांनी किती कार्सची विक्री केली हे पाहूया.

टाटा मोटर्स

एप्रिल 2026 मध्ये टाटा मोटर्सने पॅसेंजर वाहन विक्रीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने एकूण 59 हजार 701 वाहनांची विक्री केली आहे. या तुलनेमध्ये पाहता मागच्या एप्रिल महिन्यात कंपनीने 45 हजार 532 वाहनांची विक्री केली होती. एप्रिल 2025 च्या तुलनेमध्ये एप्रिल 2026 मध्ये वाहन विक्री जवळपास 31 टक्के वाढीव दिसली आहे. देशांतर्गत बाजारामध्ये पॅसेंजर वाहनांची विक्री 59 हजार इतकी राहिली आहे. मागच्या वर्षी हीच देशांतर्गत विक्री 45199 इतकी होती. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कंपनीच्या विक्रीने चांगली गती पकडली आहे. एप्रिल 2026 मध्ये विदेशात 701 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. एप्रिल 2025 मध्ये 333 वाहनांची विदेशात विक्री केली गेली होती. त्या तुलनेत पाहता यंदा हे प्रमाण 110 टक्के अधिक आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा विचार करता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मिळून एकत्रित 9150 वाहनांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 5318 वाहनांची विक्री झाली होती.

ह्युंडाई मोटर इंडिया

ह्युंडाई मोटर इंडियाने एप्रिलमध्ये देशांतर्गत विक्रीमध्ये 17 टक्के इतकी वर्षाच्या आधारावर वाढ नोंदवली आहे. ह्युंडाईने एप्रिल 2026 मध्ये 51 हजार 902 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार एप्रिलमधली ही विक्री आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री मानली जात आहे. निर्यातीचा विचार करता एप्रिलमध्ये 13708 वाहनांची निर्यात करण्यात आली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातील ह्युंडाईची वेन्यू विक्रीमध्ये आघाडीवर राहिली आहे. 12420 वाहनांची विक्री करण्यामध्ये कंपनीला यश आले आहे. तसेच मासिक विक्रीमध्ये ह्युंडाई वेन्यू ने नवा विक्रम प्रस्थापित केला.

महिंद्रा आणि महिंद्रा

महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या एप्रिल महिन्यातील वाहन विक्रीमध्ये 14 टक्के वर्षाच्या आधारावर वाढ दिसली आहे. एप्रिल 2026 मध्ये 94 हजार 627 वाहनांची विक्री महिंद्राने केली आहे. देशांतर्गत पातळीवर पॅसेंजर वाहनांची विक्री 56 हजार 331 इतकी राहिली. मागच्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत ही वाहन विक्री 8 टक्के जास्त आहे. दुसरीकडे व्यावसायिक वाहनांची विक्री 23,427 इतकी राहिली होती. ही वाहन विक्री मागच्या एप्रिलच्या तुलनेत 72 टक्के अधिक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat