Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसटीचे वाहक गुरु पिरणकर यांचा सन्मान !

एसटीचे वाहक गुरु पिरणकर यांचा सन्मान !

१५ वर्षाच्या उत्कृष्ट प्रवासी सेवेबद्दल फुकेरीवासियांची कृतज्ञता

ओटवणे : प्रतिनिधी

सावंतवाडी एस. टी. चे वाहक गुरू पीरणकर फुकेरी गावात गेली १५ वर्षे दर सोमवारी वस्तीच्या एस टी वर सेवा बजावत आहेत.

फुकेरी सारख्या दुर्गम गावातील त्यांच्या उत्कृष्ट प्रवासी सेवेबद्दल समस्त फुकेरी वासियांनी एकत्र येत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन कृतज्ञतापूर्वक विशेष सन्मान केला.गुरू पिरणकर हे सावंतवाडी तालुक्यातील मोरगावचे रहिवाशी असून गेली ३० वर्ष एस टी महामंडळात वाहक म्हणून सेवा बजावत आहेत. गेल्या पंधरा वर्षाच्या एस टी सेवेत गुरू रामचंद्र पीरणकर यांचे प्रवाशांबरोबरचे वर्तन नेहमी प्रेमळ असुन त्यांच्या गोड स्वभावाने फुकेरी गावात त्यांचा मोठा चाहतावर्ग मागच्या काही वर्षात निर्माण झाला आहे. नेहमी हसत चेहरा आणि प्रामाणिक माणूस म्हणून ते प्रवाशांमध्ये परिचित आहेत.फुकेरीसारख्या दुर्गम भागात प्रवासाची साधने मर्यादित असताना गेल्या दीड दशकापासून दर सोमवारी न चुकता वस्तीची बस घेऊन येणारे हे वाहक गावकऱ्यांसाठी केवळ एक कर्मचारी नव्हते, तर ते या गावाचा एक भाग बनले होते. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत, चढण-उताराच्या दुर्गम रस्त्यांवरून प्रवाशांना सुरक्षित पोहोचवण्याचे काम त्यांनी निष्ठेने केले.

यावेळी फुकेरीवासीयांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना त्यांच्यामुळेच आमचा बाहेरच्या जगाशी संपर्क टिकून राहिला. पावसात असो वा उन्हात, त्यांचा हसरा चेहरा आणि मदतीची भावना आम्ही कधीही विसरणार नसल्याचे सांगितले. यावेळी भावूक झालेल्या गुरु पिरणकर यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत फुकेरीवासियांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी फुकेरी सरपंच निलेश आईर, एस. टी. चालक आपा ठाकर, ज्ञानेश्वर आईर, बाळकृष्ण आईर, बाळु आईर, संदीप आईर, चिंटू आईर, न्हानु आईर, संतोष आईर, महादेव आईर, समीर आईर आदी फुकेरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat