Dailyhunt
Ganpatipule | गणपतीपुळेत 'भक्ती'चा महापूर! अंगारकी चतुर्थीसाठी लाखो भाविकांची कोकणाकडे धाव

Ganpatipule | गणपतीपुळेत 'भक्ती'चा महापूर! अंगारकी चतुर्थीसाठी लाखो भाविकांची कोकणाकडे धाव

अंगारकीनिमित्त गणपतीपुळेत भक्तांची मांदियाळी

त्नागिरी -उन्हाळी सुट्यांचा हंगाम आणि ५ मे रोजी आलेली अंगारकी चतुर्थी असा योग जुळून आल्याने गणपतीपुळे येथे भाविकांचा महापूर उसळण्याची शक्यता आहे.

या यात्रोत्सवासाठी सुमारे ६० ते ७० हजार भाविक दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यंत्रणा भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

अंगारकीनिमित्त भाविकांना स्वयंभू श्रीच्या दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मंदिराचे दरवाजे पहाटे ३.३० वाजता उघडले जाणार आहेत. मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते अभिषेक, पूजा आणि आरती झाल्यानंतर दर्शन रांगा सोडल्या जाणार आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात छप्पर (शेड) आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

गर्दी लक्षात घेता, जिल्हा पोलीस दलाचे १७ अधिकारी आणि १५० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जयगडचे प्रभारी अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे स्वयंसेवकही प्रशासनाला मदत करणार आहेत.

उन्हाळ्यामुळे पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेतात. दुर्घटना घडू नये, यासाठी किनारी भागात विशेष पोलीस गस्त असेल. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि महावितरणला समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat