Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घरातलं सोनं पळवलं, गोव्यात कॅसिनोत उडवलं ! पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा; सोनार मित्र मात्र १९ लाखांना झोपला

घरातलं सोनं पळवलं, गोव्यात कॅसिनोत उडवलं ! पोलिसांनी ४८ तासांत लावला छडा; सोनार मित्र मात्र १९ लाखांना झोपला

कोल्हापूर: घरातील तब्बल १३.८ तोळे सोन्याचे दागिने चोरून गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळून पैसे उडवणाऱ्या फिर्यादीचा भाऊ आदित्य संजय चौगुले (वय २१. रा. सूर्यनगरी, हनमंतवाडी रोड) याला करवीर पोलिसांनी ४८ तासांच्या आत अटक केली आहे.

त्याच्याकडून १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे
१३.८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, फिर्यादी आतिष संजय चौगुले (वय २६, व्यवसाय-व्यापार, रा. सुर्यनगरी, हणमंतवाडी रोड, शिंगणापूर, ता. करवीर) यांच्या राहत्या घरातून ऑक्टोबर २०२५ पासून ते २९/०७/२०२६ पर्यंत घरातील कपाटामधून १८ लाख ९७ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात दि. ३० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारींना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शन केले. तपासा दरम्यान पोलिसांना संशय आल्याने फिर्यादीच्याच घरातील आदित्य संजय चौगुले (वय २१, रा. सुर्यनगरी, हनमंतवाडी रोड) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने चोरी केलेले दागिने विकून आलेले पैसे गोवा येथे कॅसिनोमध्ये जुगार खेळून उधळल्याचे सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे १३.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये एक मंगळसूत्र, एक लक्ष्मीहार, ६ अंगठ्या, ४ चेन, १ कर्णफुले जोड व कानातील रिंगा साखळीसह १ जोड असा ऐवज जप्त केला आहे. मात्र यात आदित्यची कशीनोमध्ये चैनी झाली असली, तरी दागिने खरेदी करणारा त्याचा सोनार मित्र मात्र १९ लाखांना झोपला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक सुहास पोवार, अंमलदार विजय तळसकर, महेश बांबळे, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, प्रविण बोरचाटे, श्रीधर जाधव, सोमराज पाटील, अमोल चव्हाण आत्माराम शिंदे यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat