Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गॉफ, साबालेंका, अॅनिसिमोव्हा तिसऱ्या फेरीत

गॉफ, साबालेंका, अॅनिसिमोव्हा तिसऱ्या फेरीत

शेल्टन, सित्सिपस पराभूत, युकी भांब्री दुहेरीत पुढील फेरीत

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात विद्यमान विजेती अमेरिकेची कोको गॉफ, बेलारुसची टॉपसिडेड आर्यना साबालेंका तसेच पुरूषांच्या विभागात फ्रान्सचा 17 वर्षीय युवा टेनिसपटू मोईस कुआमे यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मात्र अमेरिकेचा बेन शेल्टन आणि ग्रीकचा सित्सिपस यांचे आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत युकी भांब्रीने आपली साथीदार पॅनोव्हासमवेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात विद्यमान विजेत्या कोको गॉफने इजिप्तच्या मायर शेरीफचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. गॉफने हा सामना 65 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या एका सामन्यात बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने फ्रान्सच्या इलेसा जॅक्वेमॉटवर 7-5, 6-2 अशी मात करत तिसरी फेरी गाठली. आतापर्यंत चारवेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविणाऱ्या साबालेंकाला गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अमंदा अॅनिसिमोव्हाने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱ्या फेरीतील सामन्यात तिची प्रतिस्पर्धी ज्युलीया ग्रॅबर प्रकृती नादुरुस्तीमुळे पहिल्या सेटमधूनच माघार घेतली.

पुरूषांच्या विभागात अमेरिकेच्या बेन शेल्टनचे आव्हान बेल्जियमच्या कॉलीगनॉनने संपुष्टात आणले. कॉलीगनॉनने शेल्टनचा 6-4, 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. फ्रान्सच्या 17 वर्षीय मोईस कुआमेने पराग्वेच्या व्हॅलेजोचा 6-3, 7-5, 3-6, 2-6, 7-6 (10-8) अशा पाच सेट्समध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत तिसरी फेरी गाठणारा फ्रान्सच्या कुआमे हा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू आहे. दुसऱ्या एका सामन्यात मॅटो अर्नांल्डीने ग्रीकच्या सित्सिपसचा 7-6 (7-2), 5-7, 6-3, 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. तसेच इटलीच्या मॅटो बेरेटेनीने फ्रान्सच्या रिंडरकेनीचचा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत तिसरी फेरी गाठली.

मिश्र दुहेरीत भारताचा युकी भांब्री आणि त्याची रशियन साथीदार अॅलेक्सांड्रा पॅनोव्हाने हॉलंडचा डेव्हीड फेल आणि युक्रेनची किचनॉक यांचा 7-6 (7-2), 7-6 (7-5) अशा सेट्समध्ये फडशा पाडत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. हा सामना दोन तास चालला होता. मात्र पुरूष दुहेरीत अनिरुद्ध चंद्रशेखर आणि जपानचा युझुकी यांचे आव्हान संपुष्टात आले. स्वीसचा जेकुब पॉल आणि ब्रिटनचा विलीस यांनी चंद्रशेखर आणि युझुकी यांचे आव्हान 6-3, 7-6 (7-9), 10-3 असे संपुष्टात आणले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat