Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गुजरात टायटन्स तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

गुजरात टायटन्स तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सवर 7 गड्यांनी मात, गिल सामनावीर, साई सुदर्शनचे अर्धशतक, वैभव सूर्यवंशीचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था

मुल्लानपूर : नियोजनबद्ध गोलंदाजीनंतर सामनावीर शुभमन गिलचे शानदार शतक, साई सुदर्शनचे अर्धशतक यांच्या बळावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळवित आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले.

रविवारी जेतेपदासाठी गुजरातची लढत विद्यमान विजेत्या आरसीबीशी होणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरातच्या योजनाबद्ध गोलंदाजीने राजस्थानच्या फलंदाजांना विशेषत: वैभव सूर्यवंशीला लगाम घातल्यामुळे त्यांना निर्धारित 20 षटकांत 6 बाद 214 धावांपर्यंत मजल मारता आली. वैभवला फटकेबाजीपासून रोखण्यात गुजरातने बऱ्यापैकी यश मिळविले. पण तरीही त्याने व अखेरच्या टप्प्यात डोनोवन फेरेराने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे राजस्थानला दोनशेची मजल मारता आली. फरेराने रशिद खानने टाकलेल्या शेवटच्या षटकात 4 षटकार ठोकत एकूण 27 धावा झोडपल्या. त्यानंतर शुभमन गिल व साई सुदर्शन यांनी 167 धावांची सलामीची भागीदारी करीत 18.4 षटकांतच गुजरातला विजय मिळवून दिला. यापूर्वी 2022 मध्ये पदार्पणतच गुजरातने जेतेपद मिळविले होते. गिलने 53 चेंडूत 15 चौकार, 3 षटकारांसह 104, साई सुदर्शनने 32 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 58 धावा फटकावल्या. राजस्थानच्या आर्चर, बर्गर व ब्रिजेश शर्मा यांनी एकेक बळी मिळविले.

लगाम घातल्यानंतरही वैभवची शानदार खेळी

बुधवारच्या एलिमिनेटर सामन्यांसाठी प्रेक्षकांनी बरीच गर्दी केली होती. पण क्वालिफायर 2 सामन्यासाठी त्याहून जास्त गर्दी केली होती, ती वंडरबॉय वैभव सूर्यवंशी फटकेबाजी पाहण्यासाठी. वैभवनेही त्यांना निराश केले नाही. यावेळी जगातील नामवंत गोलंदाज कागिसो रबाडा, जेसन होल्डर यासारख्यांना त्याने झोडपून काढले. जैस्वाल (1) व ध्रुव जुरेल (7) लवकर बाद झाल्याने वैभवने खेळपट्टीशी जुळवून घेत फलंदाजी केली. सिराज, रबाडा, प्रसिद्ध कृष्णा यांनी नियोजनाप्रमाणे गोलंदाजी करीत बॅक ऑफ लेंग्थवरून शरीराच्या दिशेने गोलंदाजी केली तर अधूनमधून बाऊन्सर्स टाकत वैभवला रोखण्यात यश मिळविले.

एलिमिनेटर सामन्यातही हीच खेळपट्टी वापरण्यात आली होती, तेव्हा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. पण आजच्या सामन्यात तो अपेक्षेप्रमाणे येत नसल्याने फटकेबाजी करणे जड जात होते. गुजरातच्या गोलंदाजांनीही त्याला फटकेबाजी करण्याची फारशी संधी दिली नाही. अशा स्थितीतही त्याने 96 धावांची खेळी करीत चाहत्यांना खूश केले. रबाडाला त्याने मारलेला सरळ षटकार हा त्याचा आजच्या खेळातील सर्वोत्तम फटका होता. विशेष म्हणजे आयपीएलमधील 1000 धावांचा टप्पाही त्याने या सामन्यात पूर्ण केला.

चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या जडेजानेही 35 चेंडूत 5 चौकार, एक षटकारासह नाबाद 45 धावा फटकावल्या. आठव्या षटकावेळी टेनिस एल्बोचा त्रास होऊ लागल्याने तो निवृत्त झाला होता. नंतर तो अखेरच्या टप्प्यात फलंदाजीस येत फरेराला चांगली साथ दिली. फरेराने जबरस्त टोलेबाजी करीत 11 चेंडूत नाबाद 38 धावा फटकावल्या. त्यात 4 षटकार व 2 चौकारांचा समावेश होता. वैभवला 46 धावांवर साई सुदर्शनकडून जीवदान मिळाले होते. वैभवने या मोसमातील सहावे अर्धशतक नोंदवले. रबाडाचा चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर त्याने जेसन होल्डरला टेनिसमधील फोरहँडसारखे काही फटके लगावले. आधीच्या सामन्याप्रमाणे तो शतकासमीप आला असताना थर्डमॅनला सलग दुसऱ्यांदा झेलबाद झाला. त्याने 47 चेंडूत 8 चौकार, 7 षटकारांसह 96 धावा झोडपल्या. कर्णधार रियान पराग 11, आर्चरने 7 धावा केल्या. रबाडा व होल्डर यांनी प्रत्येकी 2, सिराज व कृष्णा यांनी एकेक बळी टिपला.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 बाद 214 : वैभव सूर्यवंशी 47 चेंडूत 8 चौकार, 7 षटकारांसह 96, जडेजा 35 चेंडूत नाबाद 45, डोनोवन फरेरा 11 चेंडूत 2 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 38, पराग 6 चेंडूत 11, अवांतर 6. रबाडा 2-35, होल्डर 2-27, कृष्णा 1-42, सिराज 1-42.

गुजरात टायटन्स : 18.4 षटकांत 3 बाद 219 : साई सुदर्शन 32 चेंडूत 58, गिल 53 चेंडूत 15 चौकार, 3 षटकारांसह 104, वॉशिंग्टन सुंदर 16, तेवातिया नाबाद 17, अवांतर 15. आर्चर 1-45, बर्गर 1-35, ब्रिजेश शर्मा 1-44.

-गिलचे आयपीएलमधील पाचवे शतक

-सुदर्शन-गिल यांची 11 वी शतकी भागीदारी

-वैभव सूर्यवंशी सलग दुसऱ्यांदा नव्वदीत बाद, आयपीएलमध्ये 1000 धावांचा प्पा पूर्ण

-प्राथमिक फेरीतील अव्वल दोन संघच अंतिम फेरीत

-साई सुदर्शन दुसऱ्यांदा झाला 'हिट विकेट'

-गिलचे सर्वाधिक 34 झेल टिपण्याचा विक्रम. रशिद खानचा विक्रम मागे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat