जीवनोपयोगी साहित्यासह दागिने-रोकड भस्मसात : संपूर्ण घर आगीत खाक
वार्ताहर/गुंजी
गुंजीत रविवारी भर दुपारी घराला लागलेल्या आगीत जीवनोपयोगी साहित्यासह दागिने, रोकड भस्मसात होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले.
येथील रहिवासी शंकर विष्णू घाडी यांच्या मालकीचे सदर घर असून दुपारी दीडच्या सुमारास घरातील साहित्याने अचानकपणे पेट घेतल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. नेहमीप्रमाणे शंकर घाडी यांच्या पत्नी आनंदी या बाहेरच्या खोलीत कामात व्यस्त असताना अचानक आतल्या खोलीमध्ये आग दिसून आली. त्यामुळे त्यांनी गल्लीतील लोकांना आरडा ओरडा करून याची कल्पना दिली.
मात्र दुपारची वेळ असल्याने आणि घरात जळावू लाकडासह ताडपत्री व कपडे यांनी पेट घेतल्याने आगीने रौद्र स्वरूप धारण केले. त्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर अग्निशमन दलालाही पाचारण केले. गावातील तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवल्यामुळे आजूबाजूच्या घरांचा धोका टळला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण आग विझविली. मात्र तोपर्यंत घराच्या थाटासह कपडे, भांडी, कागदपत्रे, चांदीचे दागिने, 20 पोती भात आणि एक लाख रुपयांची रोकड जळून भस्मसात झाल्याने घाडी कुटुंबीय हवालदिल झाले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.
शॉर्टसर्किटमुळे आग ?
सदर दुर्घटनेत आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी सदर दुर्घटना शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. कारण घरात त्यावेळी आगीचा कोणताही स्त्राsत नव्हता. आनंदी या स्वत: घरात असताना अचानकपणे आतील साहित्याने पेट घेतला आहे. त्यामुळे सदर घटना शॉर्टसर्किटने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

