इस्रायलने घेतला सूड : 7 ऑक्टोबर हल्ल्याचा होता सूत्रधार
वृत्तसंस्था/तेल अवीव
7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड इस्रायलने घेतला आहे. इस्रायलच्या सैन्याने हमासच्या सैन्य गुप्तचर प्रमुखाचा खात्मा केला आहे.
इयान अहमद अब्दल अल-रहमान शंबारी हा हमासच्या मिलिट्री इंटेलिजेन्स ऑपरेशन्सचा प्रमुख होता आणि तो एका हल्ल्यात मारला गेला आहे. अल-रहमान शंबारी हा 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या मुख्य सूत्राधारांपैकी एक होता. इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात 5 जण मारले गेले होते. यात हमासचा एक कमांडर आणि एका 9 वर्षीय मुलाचाही मृत्यु झाला होता. आता शंबारीसोबत त्याचा मुलगाही मारला गेल्याचे वृत्त आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता. हमासने इस्रायलच्या अनेक शहरांवर सुनियोजित पद्धतीने हल्ले घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये एकूण 1200 जणांना जीव गमवावा लागला होता. तर हमासने 200 हून अधिक जणांचे अहपरण करत त्यांना ओलीस ठेवले होते. यानंतर इस्रायलने गाझापट्टीत मोठी मोहीम राबविली होती. इस्रायलने पुकारलेले हे युद्ध सुमारे 2 वर्षांपर्यंत चालले आणि यात हजारो पॅलेस्टिनी मारले गेले तर लाखो लोक बेघर झाले आहेत.
मागील वर्षी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर संघर्ष काही काळासाठी थांबला होता. इस्रायलने गाझापट्टीवरील हल्ले रोखणे आणि हमासने सर्व ओलिसांच्या मुक्ततेवर सहमती दर्शविली होती. तरीही गाझापट्टीत हिंसा जारी राहिली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार युद्धविराम लागू झाल्यावरही कमीतकमी 818 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

