तालुका म. ए. समितीचा निर्धार : डांबर मोर्चा-धरणे आंदोलन यशस्वी करणार
कन्नडसक्ती विरोधातील आंदोलनामध्ये सीमाबांधवांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवार दि. 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक परिसरात कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी द्यावी आणि हुतात्म्यांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन तालुका म.
ए. समितीच्यावतीने करण्यात आले.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : शनिवारी मराठा मंदिर येथे तालुका म. ए. समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते. प्रारंभी माजी जिल्हा पंचायत सदस्य व समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते अर्जुन गोरल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डांबर मोर्चासाठी गावोगावी जागृती
काही कन्नड संघटना व प्रशासनाकडून मराठी व्यापाऱ्यांना फलकांवरून लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून डांबर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसात पेरणीला सुरुवात होणार असल्याने 15 जूनच्या आसपास हा मोर्चा निश्चित करावा, अशी सूचना कार्यकर्त्यांनी मांडली. मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. यासाठी गावोगावी जागृती केली जाणार आहे. तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या त्या विभागातील एक कमिटी स्थापन करून जागृती होणार आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार
महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलन 20 ते 22 जून या कालावधीत करण्याची सूचना कार्यकर्त्यांनी मांडली. याचबरोबर कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी सीमाप्रश्नाची माहिती त्या त्या विभागाला दिली गेली पाहिजे असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. बैठकीमध्ये लक्ष्मण होनगेकर, अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, नारायण सावगावकर, प्रकाश अष्टेकर, मनोहर किणेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

