कामगारांच्या सोयीसाठी नवीन सेवा सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) लाखो कामगारांच्या सोयीसाठी एक अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेल सुरू केले आहे. या सुविधेमुळे ईपीएफओच्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तीवेतन-संबंधित घोषणांविषयी अद्ययावत राहणे सोपे होईल.
हे नवीन चॅनेल संवादासाठी एक अतिरिक्त व्यासपीठ म्हणून तयार करण्यात आले आहे. सदस्य व्हॉट्सअॅपच्या 'अपडेट्स' विभागातून ईपीएफओ चॅनेलची सेवा प्राप्त करू शकतात. या चॅनेलवरून ईपीएफओ सदस्य आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नवीन घोषणा, योजना-संबंधित माहिती आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स शेअर केले जाणार आहेत. ईपीएफओ आपली डिजिटल उपस्थिती वाढवत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. ईपीएफओ आधीपासूनच आपल्या सदस्य पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे सेवा देत असतानाच आता सदस्यांशी संवाद साधण्यासाठी एक्स, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आणि लिंक्डइन यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापरही करते.

