अमेरिकेने वाचवले एफ-15ई विमानाच्या पायलटचे प्राण : इराणने दावा फेटाळला
वृत्तसंस्था/ तेहरान, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या विशेष कृती दलाने अत्यंत जोखमीच्या बचाव मोहिमेत शनिवारी रात्री (4 मार्च) इराणमध्ये प्रवेश करत शत्रूराष्ट्राच्या तावडीत अडकलेल्या एका हवाई दलाच्या बेपत्ता पायलटची सुटका केली.
या मोहिमेत एकाही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला नाही. जखमी पायलटला इराणमधून थेट कुवैत येथील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने अमेरिकी लष्कराची क्षमता, वैमानिकाचे शौर्य आणि लष्करी रणनीतीची श्रेष्ठता अधोरेखित केली. दोन्ही देशांमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम एक महत्त्वपूर्ण घटना ठरली असून ती आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनली आहे.
अमेरिकन सैन्याने इराणमध्ये आपल्या दुसऱ्या एफ-15ई वैमानिकाची यशस्वीपणे सुटका केली. इराणने शुक्रवारी एका अमेरिकन एफ-15ई लढाऊ विमानाला लक्ष्य केल्यामुळे ते कोसळले होते. दोन्ही वैमानिक बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पहिल्या वैमानिकाची अमेरिकन सैन्याने तात्काळ सुटका केली, परंतु दुसरा वैमानिक इराणी हद्दीत गेला आणि त्याचा शोध सुरू होता. मोहिमेदरम्यान अमेरिकेची दोन सी-130 मालवाहू विमाने तांत्रिक बिघाडामुळे इराणमध्येच अडकली होती. ती शत्रूच्या हाती लागू नयेत म्हणून अमेरिकन सैन्याने ती स्वत:च बॉम्बने उडवून दिल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकन लढाऊ विमान पाडल्यानंतर इराणी सैन्याने वैमानिकाचा शोध सुरू केला होता. इराणनेही त्याला शोधण्यासाठी सैन्य पाठवत बक्षीसही जाहीर केले. दरम्यान, अमेरिकन सैन्याने एक व्यापक शोधमोहीम सुरू केली. अल जझीराच्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने प्रचंड गोळीबार आणि धोकादायक परिस्थितीत दुसऱ्या वैमानिकाचीही यशस्वीपणे सुटका केली. या मोहिमेत एचएच-60 ब्लॅक हॉक, ए-10 वॉर्थोग, आणि एमक्यू-9 रीपर ड्रोनचा वापर करण्यात आला. तथापि, इराणने अमेरिकेचा दावा फेटाळून लावत वैमानिकाचा बचाव झाला नसल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पायलटच्या सुटकेला दुजोरा देत 'ट्रुथ सोशल'वर यासंबंधीची माहिती जारी केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही आजवरच्या सर्वात धाडसी बचाव मोहिमांपैकी एक होती. ही मोहीम इराणच्या धोकादायक पर्वतांमध्ये शत्रूराष्ट्राच्या हद्दीत अडकलेल्या एका उच्च पदकप्राप्त कर्नलसाठी होती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ही मोहीम 24 तास चालली आणि नियोजनानुसार वैमानिकाची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली, असेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेची निर्णायक रणनीती
पायलटच्या बचावार्थ राबविण्यात आलेल्या मोहिमेने अमेरिकी लष्कराची सज्जता, उच्च रणनीती आणि शौर्य दाखवून दिले. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत ही मोहीम वैमानिकाच्या सुरक्षिततेचे आणि अमेरिकी लष्करी सन्मानाचे प्रतीक बनली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिका आपल्या सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश जगाला दिला आहे.
अमेरिकेची बचाव मोहीम अयशस्वी : इराण
अमेरिकेच्या बचाव मोहिमेदरम्यान त्यांनी दोन हेलिकॉप्टर आणि दोन मालवाहू विमाने पाडली असल्याचा दावा इराणने केला. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) नुसार, इस्फहानच्या दक्षिणेकडील भागात अमेरिकी सैन्य वैमानिकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान त्यांनी दोन सी-130 मालवाहू विमाने आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर नष्ट करून अमेरिकेची बचाव मोहीम हाणून पाडली. इराणी माध्यमांनी या विमानांच्या ढिगाऱ्याचे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसेच इराणने अमेरिकन पायलटच्या यशस्वी सुटकेचा ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. बचाव मोहीम अयशस्वी करताना अमेरिकेची विमाने व हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. इराणने ट्रम्प यांच्यावर आपला पराभव लपवण्यासाठी बचाव मोहीम यशस्वी झाल्याचा दावा केल्याचा आरोप केला आहे. तथापि, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही किंवा अमेरिकन सैन्याकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

