Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जबाबदारी निश्चित होणे आवश्यक

जबाबदारी निश्चित होणे आवश्यक

'नीट' प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात 'सर्वोच्च' टिप्पणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नीट-युजी प्रश्नपत्रिका फुटीचे जबाबदारी कोणाची, हे निश्चित होण्याची आवश्यकता आहे.

उत्तरदायित्व म्हणजेच जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय असे प्रकार बंद होणार नाहीत, अशी कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत नाहीत. त्यांच्याकडून एनटीईने काहीतरी शिकले पाहिजे, असे निरीक्षणही नोंदवण्यात आले. नीट प्रकरणाच्या सुनावणीत शुक्रवारी न्यायालयात विविध मुद्द्यांवर युक्तिवाद करण्यात आले आहेत.

आपल्या युवकांना आपण निराश करता कामा नये. असे झाल्यास तो दु:खद प्रकार घडणार आहे. नीट प्रश्नपत्रिकाफुटीच्या संदर्भात केंद्र सरकारने सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले पाहिजे. तसेच यापुढे कोणतीही प्रश्नपत्रिका फुटणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायालयाने सुनावणी जुलैमध्ये ठेवली आहे.

पंतप्रधान मोदी स्वत: लक्ष घालणार

गुरुवारच्या सुनावणीत केंद्र सरकारची बाजू महाधिवक्ता तुषार मेहता यांनी मांडली. प्रश्नपत्रिकाफुटीचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. तो व्हावयास नको होता. तो घडल्यामुळे लक्षावधी युवकांच्या पदरी निराशा पडली आहे, याची केंद्र सरकारला जाणीव आहे. पुन्हा असा प्रकार घडणार नाही, हे कसोशीने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले असून आता नीटची जी पुनर्परीक्षा होणार आहे, ती सुरळीत पार होईल, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय लक्ष ठेवून आहे. मागच्या वेळी ज्या त्रुटी राहिल्या होत्या. त्या यावेळी राहणार नाहीत आणि प्रश्नपत्रिकेसंबंधी गुप्तता शेवटच्या क्षणापर्यंत पाळली जाईल, हे सुनिश्चित केले जाईल, असे प्रतिपादन मेहता यांनी न्यायालयात केले.

प्राधिकरणाला फटकार

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकारणाने (एनटीई) आपल्या जबाबदारीकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. प्रश्नपत्रिका मागच्यावेळीही फुटली होती. त्यावेळी पुढे असे होऊ नये असा इशारा देण्यात आला होता. मागच्या चुकांवरून या प्राधिकरणाने कोणता धडा घेतला, हे स्पष्ट झाले पाहिजे. प्रश्नपत्रिका फुटून परीक्षा रद्द करावी लागली, तर विद्यार्थी वर्गाला किती त्रास होतो, याची जाणीव संबंधितांना असावयास हवी. त्यामुळे पुन्हा असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सर्व संबंधितांनी त्यांचे उत्तरदायित्व चोखपणे पार पाडावयास हवे, अशी कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एनटीईवर केली आहे.

प्रकरण नेमके काय…

वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेतली जाणारी देशव्यापी नीट-युजी ही परीक्षा 3 मे या दिवशी घेतली गेली होती. या परीक्षेला भारतातील आणि विदेशांमधील एकंदर 27 लाख हून अधिक विद्यार्थी बसले होते. तथापि, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे 7 मे या दिवशी लक्षात आले. त्यानंतर या फुटीच्या चौकशीचा आदेश देण्यात आला. 12 मे या दिवशी ही संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. ती नंतर घेतली जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली असून अनेकांना आतापर्यंत अटक झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat