Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जनतेच्या ऐतिहासिक निर्णयाचा कल !

जनतेच्या ऐतिहासिक निर्णयाचा कल !

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचे 'एक्झिट पोल' बुधवारी सायंकाळी जाहीर झाले आणि सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये यावेळी सत्ता परिवर्तन होणार, ही त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे.

तामिळनाडूमध्ये पुन्हा 'डीएमके'ची सत्ता येईल असा प्राथमिक अंदाज, तर केरळमध्ये काँग्रेसला पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. असाममध्ये भाजप प्रचंड मताधिक्याने पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. मोठ्या प्रमाणात सत्ता परिवर्तन होणार अशी चिन्हे तीन महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यांमध्ये दिसून येत होती. त्यातील सर्वात मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे राज्य ज्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते ते म्हणजे पश्चिम बंगाल.

तिथे गेली 15 वर्षे अमर्याद अशा पद्धतीची सत्ता उपभोगणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला धूळ चारणार, असा पण करूनच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे राज्य अक्षरश: पिंजून काढले होते. ज्या पद्धतीने या दोन्ही नेत्यांनी प्रचारकार्य केले आणि पश्चिम बंगालमधील जनता जणु काही भाजपची वाट पाहत होती, अशा पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या भेटीच्यावेळी दोन दोन तास प्रचंड रांगांमध्ये राहून महिलावर्ग आणि युवावर्ग उत्साहाने स्वागत करीत होते, ते पाहता या ठिकाणी सत्ता परिवर्तन होणार असा अंदाज सर्वांनाच होता. 2021 च्या तुलनेत 2026 च्या निवडणुकीचा विचार करता आजपर्यंत पश्चिम बंगालमध्ये विकासापेक्षा गुंडगिरीच जास्त होत होती. 20 वर्षांचा काळ कम्युनिस्ट पक्षाच्या कारकिर्दीत गेला.

त्यातून पश्चिम बंगाल बराच मागे राहिला. त्यानंतर त्यांना पर्याय म्हणून जनतेने ममता बॅनर्जीकडे पाहिले, परंतु त्या देखील कम्युनिस्टच्या मार्गावरूनच गेल्या. परिणामी तेथे हिंसा कधी थांबली नाही. सरकारबद्दल भीती ही केवळ हिंदू जनतेमध्येच होती, कारण सत्ताधारी पक्ष अल्पसंख्यकांच्या हितरक्षणाकडे जास्त लक्ष देत होते.

परिणामी विकासाकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. पंधरा वर्षांचा कार्यकाळ म्हणजे फारच झाला आणि हळूहळू सत्ता परिवर्तनाकडे बंगालची मंडळी पोहोचली आणि भारतीय जनता पक्षाचे 2021 मध्ये जे उद्दिष्ट होते ते आता प्रत्यक्षात 2026 च्या निवडणुकीमध्ये साध्य होत आहे, असा 'एक्झिट पोल' चा अंदाज आहे. भाजपबद्दल प्रेम आहे, अशातला भाग नव्हता परंतु पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार झाला, हिंदू जनतेचा नागरिकांचा ज्या पद्धतीने तिथे छळ होत होता ते पाहता त्यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष हाच एकमेव बलाढ्या आधार व पर्याय वाटला. त्यामुळेच प्रत्यक्षात आता ज्यावेळी एक्झिट पोलचे अंदाज आले त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर सत्तेवर येईल हे स्पष्ट झाले.

निवडणूक निकाल 4 मे रोजी होणार आहे, परंतु एखाद्या सरकारचा कार्यकाळ जर जास्त वादग्रस्त होत असेल आणि गुंडांचे जर फावत असेल, तर त्या ठिकाणी विकासाचा मुद्दा पुढे घेऊन जर सत्ता परिवर्तन होत असेल तर त्या ठिकाणी जनता देखील परिवर्तनाच्या दिशेने मतदान करत असते. केरळमध्ये जे सत्ता परिवर्तन होणार आहे त्या एकमेव राज्यात कम्युनिस्ट पार्टीचे सरकार गेली काही वर्षे सत्तेवर होते. त्या ठिकाणी आता काँग्रेस पक्ष इतर आघाडीतील पक्षांबरोबर एकत्रित येऊन सरकार स्थापन करील असा अंदाज आहे. मात्र तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा 'डीएमके' सरकार स्थापन करील.

आसाममध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर येईल. हाच एक मोठा बदल आपल्याला दिसून येतो. तीन राज्यात सत्ता परिवर्तन होईल असा जो अंदाज होता तो फोल ठरला. टीव्हीके या पक्षाने व पक्ष चालविणाऱ्या अभिनेत्याने तामिळनाडूमध्ये तोबा गर्दी आपल्या सभांना मिळविली खरी, परंतु त्याचा उद्देश यशस्वी होऊ शकत नाही.

मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या सभेला प्रचंड गर्दी होते. परंतु या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. तशीच परिस्थिती तामिळनाडूमध्ये टीव्हीके या नव्याने स्थापन केलेल्या पक्षाची झाली. या पक्षाने आपली स्वतंत्र चूल मांडल्यामुळे आणि अति महत्त्वाकांक्षा बाळगल्यामुळे तामिळनाडूमध्ये दर पाच वर्षांनी होणारे सत्ता परिवर्तन रोखले गेले.

कारण विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फूट पडली आणि त्याचा लाभ सत्ताधारी डीएमके पक्षाने घेतला आणि स्टॅलिन यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होत आहे. एकंदरीत या निवडणुकांचा विचार करता भाजपसाठी पश्चिम बंगाल हे एक महत्त्वाचे राज्य ताब्यात येत आहे. त्यातून पश्चिम बंगालचा गेल्या कित्येक वर्षात रोखल्या गेलेल्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा प्राप्त होईल. या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी ज्या पद्धतीने व शेलक्या भाषेतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले ते पाहता राजकारणाचा दर्जा बराच खालावलेला दिसून येतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: tarun bharat